‘ताश्कंद फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांवर आधारित सिनेमाच्या नावाची ट्विटवरुन केली आहे. त्यांनी या सिनेमाचं पहिलं पोस्टर पोस्ट केलं आहे. ‘ताश्कंद फाइल्स’च्या धर्तीवरच काश्मीरमधील दंगलीसंदर्भातील या सिनेमाचे नाव ‘द काश्मीर फाइल्स’ असे असणार आहे. १९९० साली झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचे कथानक असणार आहे. अग्निहोत्री यांनी या सिनेमाचे पहिले पोस्टर ट्विट करत या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये अग्निहोत्री म्हणतात, “सादर करत आहे द काश्मीर फाइल्स… पुढील वर्षी याच वेळी म्हणजेच आपल्या ७३व्या स्वातंत्र्यदिनी आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत काश्मिरी हिंदूंच्या सर्वात दुख:द आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या नरसंहाराची कहाणी.” अग्निहोत्री यांनी ट्विटच्या शेवटच्या ओळीमध्ये ही कथा सांगणे सोपे नसल्याने आमच्या चित्रपटाच्या टीमला आशिर्वाद द्या, असंही म्हटलं आहे. या पोस्टरच्या मागे ३७० असा आकडा असल्याचे दिसत असून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० हटवल्यासंदर्भातही या सिनेमातून भाष्य केले जाण्याची शक्यता आहे.

याच ट्विटला केलेल्या रिप्लायमध्ये अग्निहोत्री यांनी “१९९० साली झालेल्या नरसंहारासंदर्भातील काही माहिती असल्यास ती आम्हाला नक्की कळवा कारण हा खऱ्या अर्थाने तुमचा सिनेमा असणार आहे,” असंही म्हटलं आहे.

येत्या काही महिन्यांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’च्या शूटिंगला सुरुवात होणार असून सध्या सिनेमाच्या कथानकावर काम सुरु असल्याचे समजते. अग्निहोत्रींच्या ‘ताश्कंद फाइल्स’ या चित्रपटाची प्रेक्षक-समीक्षकांनी प्रशंसा केली होती. लालबहादूर शास्त्री यांच्या रहस्यमयी मृत्यूवर हा चित्रपट आधारित आहे.