अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर सोमवारी (१५ जून) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चित्रपटसृष्ट्रीतील मोजकी मंडळी उपस्थित होते. या मोजक्या मंडळींमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयसुद्धा होता. अंत्यविधीला उपस्थित राहिल्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीसाठी एक खुलं पत्र लिहिलं. अंत्यसंस्कारावेळी आणि या इंडस्ट्रीत राहून त्याला जे काही जाणवलं त्याबद्दल त्याने या पत्रात मांडलं.

“सुशांतच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून आज मन हेलावून गेलं. त्याच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली असती तर मी माझा अनुभव सांगून त्याच्या वेदना कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता. या वेदनांच्या प्रवासात एकेकाळी मीसुद्धा होतो आणि हे खूप त्रासदायक असतं. पण आत्महत्या हा उपाय असू शकत नाही. आपल्या मुलाला मुखाग्नी देताना त्याच्या वडिलांच्या डोळ्यात जे दु:ख होतं, ते सहनशक्तीपलीकडचं होतं. त्याची बहीण त्याला परत ये म्हणत जोरजोरात रडत होती”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

सुशांतच्या आत्महत्येसाठी इंडस्ट्री कशाप्रकारे जबाबदार आहे हेसुद्धा त्याने पुढे लिहिलं. “ही जी इंडस्ट्री स्वत:ला एक कुटुंब म्हणते, तिला आता आत्मपरिक्षण करायची गरज आहे. एकमेकांबद्दल गॉसिक कमी आणि काळजी जास्त करा. अहंकार कमी करून प्रतिभावान लोकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या इंडस्ट्रीमध्ये प्रतिभेला खतपाणी मिळालं पाहिजे, ती पायाखाली चिरडली गेली नाही पाहिजे. इथे कलाकारांचं कौतुक झालं पाहिजे, त्यांचा वापर नाही. आपण सर्वांनी डोळे उघडून पाहण्याची ही वेळ आहे”, असं म्हणत त्याने इंडस्ट्रीला खडेबोल सुनावले.

https://www.instagram.com/p/CBdxpV4nnKD/

रविवारी (१४ जून) सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. पण नैराश्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असं म्हटलं जात आहे.