अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या ट्विटमुळे वादात अडकला आहे. या ट्विटमध्ये विवेकने सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेकचा फोटो वापरला असून एग्झिट पोलवर भाष्य केले होते. हे मीम्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्याच्या या ट्विटवर राजकीय नेत्यांसह बॉलिवूडमधील कलाकारांनी टीकास्त्र सोडले. राज्य व केंद्रीय महिला आयोगानेदेखील त्याला नोटीस पाठविली. आता विवेकने ट्विटरवरुन ट्विट हटवत सर्वांची माफी मागितली आहे. त्याने दोन ट्विट केले आहेत.

पहिल्या ट्विटमध्ये त्याने ‘कधी कधी एखाद्याला जी गोष्टी पहिल्या नजरेत गमतीशीर वाटू शकते दुसऱ्यांनाही ती तशेच वाटेल असे नाही. त्यांना ती गोष्ट खटकूही शकते. मी गेली १० वर्षे महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहे. २००० मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही पुढाकार घेतला. एखाद्या महिलेचा अपमान करण्याचा विचारही माझ्या मनात येऊ शकत नाही’ असे त्याने पहिले ट्विट केले.

त्यानंतर लगेच ‘जर माझ्या मीम्सने एखाद्या महिलेला राग आला असेल तर त्यावर उपायात्मक कृतीची गरज आहे. मी माफी मागतो आणि ट्विट हटवतो’ असे विवेकने ट्विट केले आहे. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

“अत्यंत लाजीरवाणे! विवेक ही पोस्ट अत्यंत चुकीची आहे. हा योग्य मार्ग नाही. जर तुम्ही खरंच त्या महिलेची आणि लहान मुलीची माफी मागू शकत नसाल, तर निदान ती पोस्ट डिलीट करण्याची सभ्यता तरी दाखवा”, असे ट्विट करत उर्मिला यांनी विवेकला खडेबोल सुनावले आहेत.

तसेच “विवेक तू शेअर केलेला फोटो अत्यंत दर्जाहीन आणि तिरस्कार निर्माण करणारा आहे. हे योग्य नाही”, असं म्हणत सोनमने विवेकला फटकारलं आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ‘विवेक ओबेरॉय यांचे ट्विट क्रिएटिव्हीटी होऊ शकत नाही. महिलांबद्दल अनादर दाखवणारे असे ते ट्विट आहे, त्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. ते जबाबदार अभिनेते आहेत, त्यांच्याकडून अशा बोलण्याची अपेक्षा होऊ शकत नाही’ असे व्यक्तव्य केले.

काय आहे मीममध्ये?

एग्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर विवेकने एका मीमच्या माध्यमातून ऐश्वर्या रायचा भूतकाळ समोर आणला. या मीममध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोतएग्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली रिझल्ट असे लिहिले आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली आहे. या मीमबरोबर विवेकने हे खूप क्रिएटिव्ह आहे. हे राजकारण नाही, फक्त आयुष्यच समजा, असं त्याने म्हटलं आहे.