सध्या सगळ्याच चित्रपटगृहांमध्ये ‘ग्रँड मस्ती’ करणाऱ्या विवेक ओबेरॉयला प्रत्यक्षात मात्र वेगळीच मस्ती नडली आहे. अनेक चित्रपटांसाठी करार करताना आपल्या करारात ‘सेवा करा’पोटीची रक्कमही नमूद करणारा विवेक ती रक्कम सेवा कर खात्यात भरतच नसल्याचे आढळल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे सेवा कर नमूद करण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणीही विवेकने बुधवारी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याआधी त्याने सेवा कराच्या नावाखाली आपल्या करारात वळती केलेली रक्कमही विवेकच्या खिशातच गेली आहे.चित्रपट अभिनेते-अभिनेत्री करार करताना आपल्या करारपत्रात आपल्या मानधनाबरोबरच सेवाकरही आकारतात. त्यासाठी सेवा कर विभागाकडे तशी नोंदणी करणे आवश्यक असते. विवेक ओबेरॉयने अशी कोणतीही नोंदणी सेवा कर खात्याकडे केली नव्हती. तरीही तो निर्मात्यांकडून सेवा करापोटीची रक्कम घेत होता. आतापर्यंत विवेकने घेतलेली ही सेवा करापोटीची रक्कम अंदाजे ५० लाख असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
विशेष म्हणजे सेवा कर खात्यात विवेकने आपल्या नावाची नोंदणीही या कारवाईच्या आदल्या दिवशीच केली. आता सेवा कर खाते विवेकचे २०१० पासूनचे सर्व व्यवहार तपासणार आहे. त्याचप्रमाणे यापुढे कोणतेही करारपत्र करताना विवेकने ते सेवा कर खात्याला दाखवणे अपरिहार्य आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.