बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा समर्थक विवेक ओबेरॉय याने एक्झिट पोल प्रसिद्ध झाल्यानंतर ट्विटरवर एक मीम शेअर केलं होतं. त्याच्या या मीममुळे त्याच्यावर चांगलीच टीका झाली होती. त्यानंतर आता विवेकने पुन्हा एक नवं ट्विट शेअर करुन तो चर्चेत आला आहे. २३ मे रोजी (गुरुवारी) झालेल्या मतमोजणीच्या आकडेवारीवरुन केंद्रामध्ये पुन्हा एकदा भाजपा सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळेच भाजपाच्या विजयानंतर काँग्रेस पक्षाची आणि पक्षातील वरिष्ठांची सध्याची अवस्था कशी असेल हे दर्शविणारा एक फोटो विवेकने शेअर केला आहे.

विवेकने त्याच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केलेलं मीम सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. भाजपाच्या विजयामुळे काँग्रेस आणि मित्रपक्षांना धक्का बसल्याची उपरोधिक टीका या फोटोमधून करण्यात आल्याचं दिसून येत आहे.

विवेकने शेअर केलेल्या मीममध्ये काँग्रेस पक्षातील काही ज्येष्ठ नेतेमंडळी दिसत असून भाजपाच्या विजयामुळे त्यांची सध्याची अवस्था काय असेल हे सांगण्यासाठी एका डिटर्जेंट पावडरच्या जाहिरातीमधील लोकप्रिय वाक्य ‘चौंक गए’ ? या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. इतकंच नाही तर या मीममध्ये या डिटर्जेंट पावडरचं नाव ‘मोदी पावडर’ असं ठेवलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिरस्कार करणाऱ्या साऱ्या नेतेमंडळींनी त्यांचा वेळ पंतप्रधान मोदी यांचा तिरस्कार करण्यापेक्षा देशाचा विकास कसा होईल याकडे द्यावा”, असं कॅप्शन विवेकने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान,या फोटोमध्ये बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती,काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी,काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष,राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह अन्य काही राजकीय नेतेमंडळी दिसून येत आहे. या फोटोच्या वरील बाजूस चौक गए असं लिहीलं आहे. यावरुन भाजपाच्या विजयामुळे काँग्रेस आणि मित्र पक्षाला आश्चर्याचा धक्का बसलाय, असं दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.