|| भक्ती परब

नेम छोड, गेम दिखा.. असं खुद्द विराट कोहली ओमकार पटवर्धनला सांगतो आणि एकच जल्लोष. खेळ महत्त्वाचा नाही तर तो आपण कसा खेळतोय, हे महत्त्वाचं. अशी संकल्पना घेऊ न ‘गेम बनायेगा नेम’ ही टॅगलाइन घेऊ न बनवण्यात आलेले ‘आयपीएल’चे प्रोमो आज ज्याच्या त्याच्या तोंडी आहेत. प्रत्येक भारतीयाला ते आपलंच म्हणणं वाटतंय. यातच ती जाहिरात किती यशस्वी झालीय, ते दिसतं. येत्या आठवडय़ातही ‘आयपीएल’चे गारूड प्रामुख्याने प्रेक्षकांवर असेल यात शंका नाही..

‘टॅपरुट डेनस्तू’या जाहिरात कंपनीने खेळाडू वीरेंद्र सेहवागला घेऊ न पाळणाघराचं रुपक वापरून जाहिरात केली, तीही गाजली. त्यामुळे ‘आयपीएल’ची जाहिरातबाजी करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली. आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडलीय. शशांक लांजेकर यांच्या मार्गदर्शनाखालील चमूमधील पल्लवी चक्रवर्ती आणि एका गीतकाराने मिळून त्या ओळी लिहिल्या आहेत. तरुणाईला त्या ओळी भिडल्या. जसं ‘अपना टाईम आएगा’ या तीन शब्दांनी परिणाम साधला होता. तोच परिणाम या ओळीने साधला आहे. साहजिकच ‘आयपीएल’च्या सामन्यांना पहिल्या दिवसापासून प्रभावी प्रेक्षकसंख्या मिळायला सुरुवात झाली आहे. ‘स्टार इंडिया’ने त्यांच्या विविध वाहिन्यांवर त्याचं प्रसारण एकाच वेळेस केल्यानेही वेगळा परिणाम साधला गेला आहे.

परंतु दूरचित्रवाणीवरील प्रेक्षकांचा ‘आयपीएल’कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. प्रेक्षक आता एखाद्या महाएपिसोडसारखे ‘आयपीएल’चे सामने पाहू लागलाय. हिंदी किंवा मराठी मनोरंजन वाहिनीवर आठवडय़ातून एकदा किंवा १५  दिवसांनी महारविवार साजरा केला जातो. प्रेक्षकांना आता हा महारविवार सवयीचा झाला आहे. त्याच दृष्टिकोनातून ते आयपीएलकडे पाहायला लागले आहेत. महाएपिसोडमध्ये एखाद्या मालिकेची गोष्ट पुढे जात नाही, तर त्या एक तासाच्या विशेष भागात एक नाटय़मय घडामोड उत्कंठावर्धक मांडणीतून साकारली जाते. ज्यामुळे नवा प्रेक्षक त्या मालिकेला मिळतो. हे प्रेक्षकांना माहीत झालंय. त्यामुळे महाएपिसोडच्या आवरणातून मालिकांना बाहेर काढा, अस्सल कथा दाखवा, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

‘गेम बनायेगा नेम’ हे सूत्र प्रेक्षकांना मालिकांमध्येही हवंय. त्यामुळे मालिकांच्या विश्वातही याचा प्रभाव दिसून येतोय. मालिकेच्या सादरीकरणाबरोबरच विषय काय, याकडे लक्ष वेधलं जातंय. ३० मार्चपासून ‘एफवायआय१८’ या वाहिनीवर ‘फूड स्टोरीज’ नावाचा नवा कार्यक्रम सुरू झाला आहे. हा कार्यक्रम शनिवार आणि रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता पाहता येईल. पाककृतीची कुळकथा या कार्यक्रमातून उलगडणार आहे. याच वाहिनीवर ‘स्मॉल बजेट बिग मेकओव्हर’, ‘टायनी हाऊ स हंटिंग’, ‘बेस्ट केक विन्स’ हे कार्यक्रमही रंजक आहेत. ‘स्मॉल बजेट बिग मेकओव्हर’मध्ये महागडय़ा वस्तूंनी गृहसजावट करण्यापेक्षा एखादी लाकडी फ्रेमही भिंतीवर लावली तर त्यातील छायाचित्रांच्या रूपात सुंदर आठवणी जतन करू शकतो, हे पाहायला मिळणार आहे. मुळात कमीत कमी खर्चात घर कसं साजवायचं, हीच या कार्यक्रमाची संकल्पना आहे. तसेच सूत्रसंचालक मणिंदर आणि विशाखा या दोघांमुळे कार्यक्रम पाहताना आणखीनच मजा येते.

‘हिस्ट्री टीव्ही १८’वर  ‘आइस रोड ट्रकर्स’चं नवं पर्व १ एप्रिलपासून दाखल होत आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पाहता येईल. ‘लिव्हिंग फूड’ वाहिनीवर ‘दक्षिण डायरीज’ नावाचा नवा कार्यक्रम सुरू झाला आहे. भारताच्या दक्षिणेकडील खाद्यसंस्कृतीची सफर घडवणाऱ्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राकेश रघुनाथन करत असून हा एक खवय्या वल्ली आहे. त्याने खाद्यसंस्कृतीचं वेगळ्या प्रकारे निरीक्षण केलं आहे. त्याची निरीक्षणं त्याने दिलेल्या टेड टॉक्समध्ये नोंदवली होती. पाककृतींचा इतिहास माहिती करून घेण्यात त्याला रुची आहे. त्यामुळेच तो टेड टॉक्सनंतर प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या सूत्रसंचालनामुळे ‘दक्षिण डायरीज’ हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंजक होईल, हे मात्र नक्की. गुरुवार आणि शुक्रवार रात्री ८.३० वाजता हा कार्यक्रम पाहता येईल. याच वाहिनीवर प्रसिद्ध शेफ पंकज भदोरिया यांचा ‘थ्री कोर्स विथ पंकज’ हा कार्यक्रमही लोकप्रिय ठरला आहे.

‘एपिक’ वाहिनीवर ‘राजा रसोई और अंदाज’ या अनोख्या कार्यक्रमाचं दुसरं पर्व पाहायला मिळतंय. त्यात इराणी खाद्यसंस्कृतीची सफर सध्या घडते आहे. परंतु शेफ रणवीर ब्रार यांचं सूत्रसंचालन फार गोंधळ घालतं. त्यांच्याकडे माहिती आणि गोष्टींचा खजिना बराच आहे. पण सादरीकरण मात्र खटकतं.

‘एपिक’ वाहिनीच्या चाहत्यांसाठी अजून एक खूशखबर म्हणजे ‘लॉस्ट रेसिपीज’ या कार्यक्रमाचं लवकरच दुसरं पर्व येणार असून या पर्वातही मॉडेल आणि शेफ आदित्य बाळ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊ न विस्मृतीत गेलेल्या पाककृती उजेडात आणण्याचं काम या कार्यक्रमानं चोख पार पाडलं होतं. आता देशाच्या अजून तळागाळातून, गल्लीबोळातील भागात आदित्य फिरणार आहे. खासकरून हंपी, बोध गया, दार्जिलिंग, महाराष्ट्र आणि विशाखापट्टणममधील काही भागात तो फिरणार आहे.

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ  द्या’च्या मंचावर बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकदा येणार आहेत. यावेळी आमिर खान आणि किरण राव हे दोघे एक स्किट सादर करणार असून त्यासाठी ते दोघंही गावकरी बनले आहेत. पाहू या, ते येत्या सोमवारी स्किटमधून काय संदेश देतात. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘जीव झाला येडापिसा’ ही मालिका १ एप्रिलपासून सुरू होते आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता दाखवण्यात येणार असल्याने याच दिवसापासून ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका रात्री ९.०० वाजता दाखवली जाणार आहे. अभिनेता सागर देशमुख ‘स्टार प्रवाह’च्या ‘भीमराव’ या चरित्रात्मक मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारणार आहे. विविध चित्रपटांतून भूमिका साकारलेला खासकरून ‘भाई व्यक्ती की वल्ली’ चित्रपटात पुलंच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या सागरकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

एकंदरीत छोटय़ा पडद्यावर खासकरून मराठी प्राइम टाइम मालिकांमध्ये प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळत आहेत. पण त्यांची ओळख त्यांच्या मालिकेतील व्यक्तिरेखेमुळे आणि कथेमुळे अजून प्रभावी होतेय. त्यामुळे ‘गेम बनाएगा नेम’च्या आधारे म्हणायचं तर त्या त्या मालिकांमुळे या प्रसिद्ध कलाकारांच्या प्रसिद्धीत अजून भर पडते आहे.