विविध टेलिव्हिजन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि ‘रॉक ऑन’ या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता पूरब कोहली नुकताच विवाहबंधनात अडकला. तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या पूरबने अतिशय खासगी विवाहसोहळ्यात प्रेयसी लूसी पेटन हिच्याशी लग्नगाठ बांधली. काही खास मित्रमंडळी आणि कुटुंबातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरबच्या लग्नाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली.

पूरब आणि लूसी या दोघांनीही त्यांच्या मुलीच्या म्हणजेच इनायाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर पूरब आणि लूसीच्या विवाहसोहळ्यातील व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये ते दोघंही लग्नाच्या जोड्यामध्ये शोभून दिसत होते. लग्नाच्या वेळी पूरब पारंपरिक पंजाबी वराच्या रुपात तयार झाला होता. तर लूसीही लाल रंगाच्या लेहंग्यात सुरेख दिसत होती. लूसी ही मुळची युकेची असून, ती व्यवसायाने योग विद्या प्रशिक्षक आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून ती आणि पूरब रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे ते लग्न कधी करणार हा प्रश्न चाहत्यांच्याही मनात घर करत होता. अखेर या दोघांनी पुढचं पाऊल उलचत नात्याला नवं नाव दिलं आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं.

गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात या दोघांनीही आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी ‘POW बंदी युद्ध के’ या मालिकेत पूरबच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता पूरी हिनेसुद्धा हजेरी लावली होती. अमृतानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पूरबसोबतचा फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण