‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटामुळे शास्त्रीय संगीत, नाटय़संगीत आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचले आहे. तरुणाईमध्ये शास्त्रीय व नाटय़संगीताबद्दल आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे मला मिळालेला पुरस्कार हा तरुणाईचा पुरस्कार आहे.

माझ्या गाण्यावर, गळ्यावर संस्कार केले ते ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि ज्यांनी ‘कटय़ार काळजात घुसली’ या मूळ नाटकातील पदे संगीतबद्ध केली ते पं. जितेंद्र अभिषेकीबुवा, माझी आई, गांगुर्डे सर, शौनक अभिषेकी यांचे ‘कटय़ार’ हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणले व मला त्यात संधी दिली तो राहुल देशपांडे, ‘कटय़ार’च्या चित्रपटाचे भव्य स्वप्न पाहणारा, ते प्रत्यक्षात उतरविणारा, चित्रपटासाठी गायक म्हणून संधी दिली तो सुबोध भावे आणि मला अक्षरश: बारा-बारा तास समोर बसवून, माझ्याकडून गाणी गाऊन घेणारे, मार्गदर्शन करणारे शंकर महादेवन यांचा आणि चित्रपटातील शास्त्रीय संगीतावर आधारित असलेल्या गाण्यांवर आणि नाटय़संगीतावर मोठय़ा प्रमाणात प्रेम करणारी आजची तरुणाई या सगळ्यांचा हा पुरस्कार आहे.

हा पुरस्कार मला मिळाला असला म्हणजे माझ्या नावावर असला तरी तो केवळ आणि केवळ प्रातिनिधिक स्वरूपात आहे, असे मी मानतो. या सगळ्यांचे पुरस्कारात महत्त्वाचे योगदान आहे. मौल्यवान वस्तू तुम्ही जर दर्जेदार पद्धतीने सादर केली तर त्याला हमखास दाद मिळते, त्याचे कौतुक होते. आजच्या तरुणाईला शास्त्रीय संगीत आवडत नाही इथपासून ते अन्य गोष्टींबाबत त्यांच्यावर टीका केली जाते. पण ‘कटय़ार’नंतर आज हे चित्र बदललेले पाहायला मिळत आहे. मी व राहुल आमच्या शास्त्रीय संगीताच्या किंवा नाटय़पदे गायनाच्या मैफली/कार्यक्रम आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात करत आहोत. सर्व ठिकाणी श्रोत्यांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत असून त्यातही लक्षणीय उपस्थिती ही तरुणांची आहे.

नुकताच सांगली येथे ‘अबकड’ संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता. तेथेही तरुणाई मोठय़ा संख्येने उपस्थित होती. कार्यक्रम संपल्यानंतर आमच्याशी गप्पा, भ्रमणध्वनीत आमच्याबरोबर ‘सेल्फी’, स्वाक्षरी घेणे हा कार्यक्रमही बराच वेळ चालला. नाशिक येथे आमचा कार्यक्रम झाला तेव्हा तर चक्क रस्ता बंद पडला. इतकी गर्दी झाली होती. हा बदल आता प्रकर्षांने जाणवतो आहे. पूर्वी ‘कटय़ार’ किंवा अन्य संगीत नाटकांच्या प्रयोगाला ८० टक्के ज्येष्ठ नागरिक व २० टक्के तरुणांची उपस्थिती असायची. आता बरोबर उलटे चित्र झाले आहे.

तरुणांमध्ये शास्त्रीय संगीत, नाटय़संगीत यांची आवड निर्माण झाली आहे. आजची तरुणाई या प्रकारचे संगीत ऐकते आहे. शास्त्रीय संगीत गायकांना चित्रपटातील कलाकारांप्रमाणे प्रसिद्धी मिळते आहे, ते ‘सेलिब्रेटी’ झाले आहेत. आत्तापर्यंत शास्त्रीय संगीत हे ‘क्लासेस’साठी होते असे मानले जायचे. ‘कटय़ार’ चित्रपटामुळे आता ते ‘मासेस’पर्यंत पोहोचले आहे. या सगळ्यात ‘कटय़ार’ चित्रपटाचे मोठे योगदान आहे. शास्त्रीय व नाटय़संगीताची आवड आजच्या तरुणाईमध्ये निर्माण करण्याचा पाया ‘कटय़ार’ने घातला आहे. ही तर केवळ सुरुवात असून शास्त्रीय संगीताचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.

महेश काळे

शब्दांकन-शेखर जोशी