तबलानवाझ उस्ताद अल्लारखाँ यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘उस्ताद अल्लारखाँ इन्स्टिटय़ूट ऑफ म्युझिक’तर्फे रविवार, ३ फेब्रुवारी रोजी मुंबईत षण्मुखानंद सभागृहात एका संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत क्षेत्रातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर या सोहळ्यात आपली कला सादर करणार आहेत. अल्लारखाँ यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांच्या तबलावादनाने संगीत सोहळ्याची सांगता होणार आहे. या निमित्ताने झाकीर हुसेन यांच्याशी केलेली खास बातचीत..
मोठय़ा वृक्षाखाली लहान झाडे वाढत नाहीत किंवा त्यांची जोमाने वाढ होत नाही, ती खुरटलेली राहतात, असे म्हटले जाते. मात्र तबला क्षेत्रातील उस्ताद अल्लारखाँ आणि त्यांचे सुपुत्र झाकीर हुसेन याला अपवाद ठरले आहेत. आपल्या तबलावादनाने साऱ्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या उस्ताद अल्लारखाँ यांचा तबलावादनाचा वारसा झाकीर हुसेन यांनी केवळ जोपासलाच नाही तर त्याचे संवर्धनही केले. तबल्याची कला वडिलांप्रमाणेच त्यांनीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविली. झाकीर हुसेन यांना प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पैसा आणि पुरस्कार मिळाले. त्यांचाही खूप मोठा शिष्यवर्ग आहे. या स्थानावर पोहोचल्यानंतर आजही त्यांचे शिकणे सुरू आहे. ‘सगळे काही आपल्याला येते, आता शिकण्यासारखे काही नाही, असे कधीही समजू नकोस. सतत नवीन काही शिकत राहा. त्यातूनच तुला खूप काही शिकायला मिळेल’ ही अब्बाजींनी दिलेली शिकवण त्यांनी आजही मनावर कोरून ठेवली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची भेट घेतली असता साहजिकच गप्पांना सुरुवात झाली ती उस्ताद अल्लारखाँ यांच्याविषयीच्या प्रश्नाने..
तबल्याचा नकळत संस्कार
वडील आणि गुरू म्हणून अब्बाजींबद्दल काय सांगाल? असे विचारल्यावर थोडे भावूक होत ते म्हणाले, अब्बाजी आणि माझे नाते हे वेगवेगळ्या वयात विविध टप्प्यांवर उलगडत गेले. अल्लारखाँ हे माझे वडील होतेच, पण त्याबरोबरच अब्बाजी मला वेगवेगळ्या टप्प्यांवर मित्र, सहकारी, मार्गदर्शक आणि गुरू म्हणून भेटत गेले. अगदी लहान असताना, त्यांच्या अंगाखांद्यावर खेळताना माझ्यावर नकळत तबलावादनाचा संस्कार झाला. माझ्या त्या अजाणत्या वयात तबल्याचे बोल सातत्याने कानावर पडत होते. घरी अब्बाजी तबल्याची शिकवणी घ्यायचे, शिष्यांना शिकवायचे ते सारे पाहात होतो. पुढे मला त्यांच्याकडूनच तबल्याची शिकवण मिळाली. मोठा होत गेलो तसा त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी मैफलींना जायचो, त्यांना साथ करायचो. यातून मी घडत आणि शिकत गेलो. या सगळ्या प्रवासात ते कधी माझे मित्र तर कधी सहकारी झाले. गुरू तर होते आणि आजही आहेत.
आपणही तबलावादक व्हावे, असे नेमके कधी वाटले? तो क्षण कधी आला? या विषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, वडील तबलावादक आहेत, म्हणून आपणही तबलावादक व्हावे, असे मी काही ठरविले नव्हते. पण लहानपणापासून घरातच तबला आणि तबला असे वातावरण असल्याने तबल्याकडे माझा साहजिकच ओढा होता. घरात तबला आणि डग्गा यांचे संच असायचे. न कळणाऱ्या वयात मी ते घेऊन वाजवत बसायचो. आता नेमका दिवस आठवत नाही. पण मी सात-आठ वर्षांचा होता. एके दिवशी रात्री अचानक वडिलांनी मला जवळ घेतले आणि ते माझ्याशी फक्त आणि फक्त तबला या विषयावर भरभरून बोलले. ते नेमके काय बोलले हे कळण्याचे खरे तर माझे वय नव्हते. त्या दिवसानंतर पुढे तीन-चार वर्षे हा सिलसिला असाच सुरू राहिला. वडिलांना जेव्हा वाटेल तेव्हा ते माझ्याशी तबला या विषयावर भरभरून बोलत, माहिती देत. अर्थात हे सर्व केवळ बोलणे होते, ती तबल्याची शिकवणी नव्हती. कदाचित माझ्या पुढील वाटचालीची ती नांदी ठरली असेल. पुढे ११/१२ व्या वर्षांनंतर वडिलांकडून तबल्याची शिकवणी सुरू झाली. आज मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच. आपल्याकडे जे काही आहे ते मला किंवा अन्य कोणालाही देताना त्यांनी स्वत:ला उस्ताद किंवा मी कोणीतरी मोठा आहे, असे कधीही मानले नाही. ते सतत नवीन शिकण्याच्या वृत्तीचे होते. मला सर्व काही येते, असे माणसाने कधीही समजू नये, तर सतत शिकण्याची वृत्ती ठेवावी. यातून आपण घडत जातो, आपल्याला काही नवीन मिळते, असे ते नेहमी सांगायचे. अब्बाजी यांनीही शेवटपर्यंत ही वृत्ती जोपासली आणि आजही त्यांची ही शिकवण मी विसरलेलो नाही.  
वादकांची उपेक्षा
सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर सुरू असलेले संगीतविषयक रिअॅलिटी शो, परीक्षक हा विषय निघाला. याविषयी आपले परखड मत व्यक्त करताना ते म्हणाले, आजकाल या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांकडून किंवा भ्रमणध्वनीवरील लघुसंदेशाच्या माध्यमातून सवरेत्कृष्ट गायक/गायिकेची निवड केली जाते. मला हे पटत नाही.
खरे तर संगीत क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञ मंडळींकडूनच ही निवड केली गेली पाहिजे. तीच मंडळी त्या गायक/गायिकेतील गुणदोष हेरून, त्याच्यातील गुणवत्ता जोखून खरोखरच सवरेत्कृष्ट अशा गायक/गायिकेची निवड करू शकतात. पण आजकाल तसे होत नाही. काही वर्षांपूर्वी एका रिअॅलिटी शोसाठी मी, पं. जसराज आदींनी परीक्षक म्हणून काम केले होते. आमची मते विचारात घेऊनच अंतिम निवड केली गेली होती. त्यानंतर काही वाहिन्यांकडून परीक्षक म्हणून काम करण्यासाठी विचारणा केली गेली होती. पण अंतिम निवडही वेगळ्या पद्धतीने केली जाणार असल्याने ते पटले नाही. रिअॅलिटी शोमधूनही उत्कृष्ट गायक/गायिका निवडले जातात. विविध पुरस्कार सोहळ्यात संगीतासाठी पाश्र्वगायन, संगीतकार यासाठी पुरस्कार दिले जातात पण संगीतात ज्या वादकांना अत्यंत महत्त्व आहे, त्यांचा मात्र आजवर कधी विचार केला नाही. एखादा रिअॅलिटी शो किंवा  पुरस्कार सोहळ्यात तबला, हार्मोनियम, बासरी, गिटार, व्हायोलिन, सारंगी किंवा अन्य वाद्यांची संगीतसाथ करणाऱ्या वादकांना त्यांच्या कामगिरीसाठी का गौरविले जात नाही. संगीतसाथ देणारे हे वादक उपेक्षितच राहिले आहेत, अशी खंतही झाकीर हुसेन यांनी व्यक्त केली.
पं. वसंतराव देशपांडे ‘घेई छंद मकरंद’ हे गाणे गाणार असतील तर त्यांना संगीतसाथ करताना मला किंवा कोणत्याही तालवादकाला ते गाणे अगोदर समजून घेतले पाहिजे. त्यावर अभ्यास केला पाहिजे. गायकाच्या गळ्यातील नेमक्या जागा तालवादकालाही पकडता आल्या पाहिजेत. गाण्यात तालवादकांचे महत्त्व खूप आहे, त्यांना कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे तालवादकांचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे, असेही झाकीर हुसेन यांनी ठामपणे सांगितले.
तबला कलेला उज्ज्वल भवितव्य
पालकांनी आपल्या मुलातील सुप्त कलागुण अगोदर ओळखावेत. एखाद्या मुलाला तबल्याची आवड असेल तर त्याला थेट एखाद्या मोठय़ा दिग्गज तबलावादकाची शिकवणी लावू नये. अगोदरची काही वर्षे त्या दिग्गजाच्या एखाद्या चांगल्या शिष्याकडे शिकवणी लावावी. त्याच्यातील कलागुणांना तेथे संधी मिळेल. दरम्यान त्याला खरोखरच पुढे शिकायची आवड व इच्छा आहे का हेही कळू शकेल. काही वर्षांनंतर दिग्गज गुरूकडे त्याला शिकायला पाठवावे. हीच बाब कोणत्याही कलेला किंवा तालवाद्य शिकण्यासाठी लागू पडते, असे मला वाटते.     
संगीतात गुरू-शिष्य परंपरा खूप महत्त्वाची असल्याचे झाकीर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. एक कला म्हणून तबलावादन ही सर्वश्रेष्ठ कला असून या कलेचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगून झाकीर म्हणाले की, विजय घाटे, योगेश सम्सी, अनिंदो चॅटर्जी, सत्यजित तळवलकर, आदित्य कल्याणपूर आणि इतरही अनेक चांगले तबलावादक आज आपल्याकडे आहेत. भविष्यातही मोठय़ा संख्येने चांगले तबलावादक घडतील, तयार होतील, असा विश्वासही झाकीर हुसेन यांनी गप्पांच्या शेवटी व्यक्त केला.