बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार साजिद-वाजिद यांच्यामधील वाजिद यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती व्हायरल झाली होती. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र वाजिद यांनी या अफवा असल्याचं म्हटलं आहे.

वाजिद खान यांच्या आर्टेरिअलमध्ये ब्लॉकेज (arterial blockage) आढळून आल्यामुळे सोमवारी त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळे वाजिद यांनी मानसिक त्रास झाला असून या अफवा असल्याचं वाजिद यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

‘माझी प्रकृती खालावल्याचे वृत्त खोटे आहे. मला काहीही झालं नसून मी ठीक आहे. पण तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता हे या अफवेमुळे मला समजलं. माझी काळजी केल्याबद्दल तुमच्या साऱ्यांचे मनापासून आभार’, असं वाजिदने ट्विट केलं आहे.

दरम्यान, वाजिद यांच्या आर्टेरिअलमध्ये ब्लॉकेज (arterial blockage) असल्यामुळे त्यांच्या छातीत अचानक दुखू लागलं आणि त्यामुळेच त्यांनी सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसंच त्यांना डॉक्टरांनी अतिदक्षता विभागातही हलविण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं.

साजिद-वाजिद यांनी पहिल्यांदा १९९८ मध्ये सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं. त्यानंतर या दोघांच्या जोडीनेबॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांना संगीत दिल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटासाठी त्यांना २०११ मध्ये फिल्मफेअर पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. वाजिद यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांना संगीत दिलं असून ‘मुझसे शादी करोगी’, ‘दबंग’ आणि ‘टायगर जिंदा है’ या सारख्या सुपरहिट चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं आहे.