बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं निधन झालं आहे. ते ४२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून वाजित किडनीच्या समस्येमुळे त्रस्त होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान वाजित यांनी संगीतकार मिका सिंगसोबत शेवटची बातचीत केली होती. त्यांच्या शेवटच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ही ऑडिओ क्लिप पीपिंग मून या वेबसाईटने आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केली आहे. मिका सिंग याने वाजित यांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. यावेळी त्याने एकत्र काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. यावर वाजित म्हणाले होते, “धन्यवाद, तुझा मेसेज वाचून खूप आनंद झाला. सध्या मी तंदुरुस्त होत आहे. देवाने कृपा केली तर लवकरच मी ठिक होईन. तुमच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. माझ्यासाठी प्रार्थना करा. आपण लवकरच भेटू.”

कोण होते वाजित खान?

१९९८ मध्ये साजिद-वाजिद या जोडगोळीने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाला संगीत देऊन आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यानंतर सलमान खानच्या ‘गर्व’, ‘तेरे नाम’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘पार्टनर’, ‘दबंग’ यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली, गायली आणि संगीतही दिले. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेले सलमान खानचे ‘प्यार करोना’ आणि ‘भाई भाई’ गाणेही साजिद-वाजिद जोडीने संगीतबद्ध केले होते. वाजिद यांचे ते शेवटचे गाणे ठरले. सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटासाठी त्यांना २०११ मध्ये फिल्मफेअर पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. वाजिद यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांना संगीत दिलं असून ‘मुझसे शादी करोगी’, ‘दबंग’ आणि ‘टायगर जिंदा है’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा त्यात समावेश आहे.