बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. ‘झिरो’चं हे अपयश बाजूला सारत आता शाहरुखने एका क्रिकेटरची भूमिका साकारायला आवडेल असं म्हटलंय. हा क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. होय..शाहरुखला पडद्यावर विराट कोहलीची भूमिका साकारायची इच्छा आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने ही इच्छा बोलून दाखवली.

‘संधी मिळाली तर क्रिकेटर विराट कोहलीची भूमिका साकारायला आवडेल,’ असं शाहरुख म्हणाला. इतकंच नव्हे तर ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातील लूक विराटसारखाच होता असंही तो म्हणाला. या मुलाखतीदरम्यान शाहरुखसोबत विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील होती. तुला विराटची भूमिका साकारण्यासाठी त्याच्यासारखी दाढी वाढवावी लागेल, असं ती गमतीशीरपणे म्हणाली. त्यावर ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटातील लूकचं उदाहरण देत आपण विराटसारखं दिसू शकतो असं किंग खाने सांगितलं.

वाचा : ..तर ‘बाहुबली’मध्ये दीपिकाने साकारली असती ‘देवसेना’ 

एकीकडे ‘झिरो’ चित्रपटावर नेटकऱ्यांकडून टीका होत असताना विराटने मात्र आपल्याला चित्रपट आवडल्याचं ट्विट केलं आहे. ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर असणाऱ्या विराटने ट्विट करुन पत्नी अनुष्काची स्तुती केली आहे.