सध्या कलाविश्वात बायोपिकची लाटच आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती हिंदी आणि मराठीतही होत आहे. त्यांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘फँड्री’, ‘सैराट’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही बायोपिक निर्मितीची इच्छा व्यक्त केली आहे. महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना भेटीला आणण्याची इच्छा नागराज यांनी व्यक्त केली आहे.

‘अर्धांगवायूचा आजार जडल्यावरही समाजसुधारणेचं कार्य सातत्याने केलेल्या महात्मा जोतिबा फुलेंचा माझ्यावर विलक्षण प्रभाव आहे. त्यांचे व्यक्तिचित्र बायोपिकद्वारे जनतेपुढे आणायला मला आवडेल. तर दुसरीकडे ज्वारीचे धान तुडवू नये म्हणून सैन्याला बजावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही माझ्या मनात तेवढीच आत्मीयता आहे. त्यांची युद्धनीती, राजनीती अद्वितीय होती. या दोन्ही व्यक्तिमत्त्वांवर मला चित्रपट करण्याची खूप इच्छा आहे,’ असं ते म्हणाले.

वाचा : शुभमंगल सावधान! कोंकणी पद्धतीने दीपिका- रणवीर विवाहबद्ध

सध्या नागराज मंजुळे आगामी ‘झुंड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ते काम करत आहेत. बिग बींसारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करणं खूप अवघड आहे, असं मंजुळे यांनी सांगितलं. या चित्रपटाची संपूर्ण शूटिंग नागपूरमध्ये होणार आहे. ‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी एका निवृत्त क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाधीन गेलेल्या एका मुलाचं आयुष्य फुटबॉल या खेळामुळे कसं सुधारतं याविषयीचं कथानक साकारण्यात येणार आहे.