बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. नेहाने सोशल मीडियावर पती अंगद बेदी आणि मुलगी मेहरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. आता नेहाने एका मुलाखतीमध्ये प्रेग्नंट असल्यामुळे काही प्रोजक्ट्समधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा खुलासा केला.

नेहाने नुकतीच ‘द क्विंट’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने दुसऱ्यांदा प्रेग्नंट असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे सांगितले आहे. प्रेग्नंट असताना नेहाला आणि तिच्या कुटुंबीयांना करोना देखील झाला असल्याचे तिने सांगितले. तसेच प्रेग्नंट असल्यामुळे तिला काही प्रोजक्ट्समधून काढण्यात आल्याचे नेहाने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

प्रेग्नंट असतानाही नेहाने स्वत:ला कामात व्यग्र ठेवले आहे. तिने ‘A Thursday’चे चित्रीकरण सुरुच ठेवले होते. या चित्रपटात नेहाने प्रेग्नंट महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. नेहासोबत या चित्रपटात यामी गौतम, अतुल कुलकर्णी, डिंपल कपाडिया हे कलाकार आहेत. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. पण या चित्रपटाच्या व्यतिरिक्त नेहाला प्रेग्नंट असल्यामुळे काही प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असल्याचे तिने सांगितले. ‘गर्भवती असल्याची घोषणा केल्यानंतर मला काही प्रोजेक्टसमधून काढण्यात आले’ असे नेहा म्हणाली.

४० वर्षांच्या नेहा धूपियाने २००२ साली मिस इंडियाचा किताब जिंकला होता. २००३मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १० मे २०१८मध्ये नेहाने अंगद बेदीशी लग्न केले. नेहाने प्रेग्नंट असल्यामुळे अंगदशी लग्न केल्याचे म्हटले जात होते. लग्नाच्या ६ महिन्यांनंतर १८ नोव्हेंबर २०१८मध्ये नेहाने एका मुलीला जन्म दिला. तिच्या मुलीचे नाव मेहर आहे. आता नेहा पुन्हा प्रेग्नंट असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते.