उरी हल्ल्याचा भारतीय चित्रपटसृष्टीवर इतका गंभीर परिणाम होऊ शकेल याची अनेकांनी कल्पनाही केली नव्हती. पण उरी हल्ला, वारंवार होणारे दहशतवादी हल्ले, भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेले सर्जिकल स्ट्राईक या सर्व घटनांनंतर भारत-पाकिस्तानमधील तणावात आणखी वाढ झाली आणि त्याचे पडसाद भारतीय चित्रपटसृष्टीवरही उमटले. पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी घातलेल्या बंदीनंतर ‘रईस’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटांना त्याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. या चित्रपटांमध्ये माहिरा खान आणि फवाद खान या पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असल्यामुळे त्यांच्याऐवजी दुसऱ्या कलाकारांना चित्रपटात संधी देण्याची सतत मागणी होत आहे. म्हणूनच करण जोहरवर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील फवादच्या पात्रामुळे चित्रपटातील कथानकामध्ये काहीसे बदल करण्याची वेळ आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या चित्रपटाला सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाच सोशल मीडियावर सध्या ‘ऐ दिल है मुश्किल’च्या नवीन ट्रेलरचा व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. अभिनेता फवाद खानऐवजी या ट्रेलरमध्ये एक नवा चेहरा दिसत आहे. लेखक सुमित पुरोहितने ‘ऐ दिल है मुश्किल’च्या ट्रेलरमधून फवाद खानच्या चेहऱ्याऐवजी ‘एफटीआयआय’चे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांचा चेहरा लावला आहे. फवाद ऐवजी गजेंद्र चौहान यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करणने चित्रपटातील कथानकात बदल करण्यासाठीची तयारी सुरू केली असून या चित्रपटातील ऐश्वर्या आणि अनुष्काच्या राष्ट्रीयत्वातही तो बदल करु शकतो. सध्या चित्रपटाच्या कथानकानुसार ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये अनुष्का आणि ऐश्वर्या साकारत असलेल्या भूमिकांची पाळेमुळे पाकिस्तानमधील आहेत.  त्यामुळेच करणने त्यांचे राष्ट्रीयत्व बदलण्याची तयारी केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या निनावी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटामध्ये करण फवादच्या ऐवजी अभिनेता सैफ अली खानला त्याची भूमिका देणार असल्याची चर्चा आहे. येत्या दिवाळीमध्ये २८ ऑक्टोबरला करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.