टि्वटर किंवा ऑनलाईन मार्केटिंगद्वारे चित्रपटाच्या प्रसिद्धीस सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदाच अनोखे असे काही होत आहे. हे फक्त बॉलिवूडचा ‘खिलाडी’च करू शकतो. टि्वटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर अद्याप कुठलाच चित्रपट इतक्या काळासाठी ट्रेण्डिंगमध्ये राहिलेला नाही, जितका अक्षय कुमारचा ‘बेबी’ हा आगामी चित्रपट ट्रेण्डिंगमध्ये आहे. अक्षय कुमारच्या निष्ठावान चाहत्यांच्या प्रेमामुळे काही रेकॉर्ड मोडीत निघाले असून, काही नवीन रेकॉर्ड प्रस्थापित होत आहेत. होय, आम्ही नीरज पांडे दिग्दर्शित आणि अक्षय कुमारचा अभिनय असलेल्या बेबी या आगामी चित्रपटाविषयी बोलत आहोत. जेव्हापासून अक्षय कुमार आणि ‘स्पेशल २६’चा दिग्दर्शक नीरज पांडे एकत्र येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले, तेव्हापासून अक्षयच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अक्षय आणि नीरजच्या आगामी चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते अधीर झाले आहेत. चित्रपटाचे अधिकृत ट्रेलर ३ डिसेंबरला येणे अपेक्षित आहे, चाहत्यांनी ‘वेटिंग फॉर ‘बेबी’ ट्रेलर’ हा सोशल मीडिया टॅग तयार केला असून, ‘बेबी’ चित्रपटाच्या ट्रेलरबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या १४ दिवसांपेक्षा अधिक काळ हा विषय सोशल मीडियावर टॉप टेनमध्ये ट्रेण्ड होत आहे. ‘बेबी’ चित्रपटात राणा दग्गुबती, तपसी पन्नु, अनुपम खेर आणि डॅनी डेन्झोप्पा यांच्यासुद्धा भूमिका आहेत.

चाहत्यांच्या भावनांची कदर करीत काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार आणि चित्रपटकर्त्यांनी ‘बेबी’चा खास टिझर आणि फर्स्ट लूक सादर केला. यात चित्रपटाविषयी जास्त काही दाखविण्यात आले नसून, चित्रीकरणाचा काही भाग आणि नीरज पांडेची दिग्दर्शक म्हणून ओळख करून देण्यात आली आहे. नीरज पांडेचा ‘बेबी’ चित्रपट पुढच्या वर्षी २३ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जस जशी जवळ येत आहे, तस तशी चित्रपटाविषयीची चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बेबी’ चित्रपटाबाबतची चाहत्यांमधली उत्सुकता पाहता, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून देणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसते आहे.