छोट्या पडद्यावर गाजलेल्या एकताच्या अनेक मालिकांपैकी एक ‘कसौटी जिंदगी की’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकतानं नुकताच या मालिकाचा पहिलावहिला टिझर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ‘प्रेम कधीही संपत नसतं. जेव्हा तुम्हाला वाटतं की आता सगळं संपलंय त्याचवेळी प्रेम तुमच्याकडे परत येतं असं लिहित एकतानं ‘कसौटी’चा टिझर प्रदर्शित केला.

आजही या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. प्रेरणा – अनुरागची भूमिका साकारणारे श्वेता तिवारी, सीजेन, मालिकेतील खलनायिका कोमोलिका अर्थात उर्वशी ढोलकिया, मिस्टर बजाज म्हणजेच रोनित रॉयनं या सगळ्यांवरच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. त्याचबरोबर मालिकेच्या टायटल ट्रकलाही विशेष प्रसिद्धी मिळाली. टीआरपीचे अनेक रेकॉर्ड या मालिकेने मोडले. तेव्हा ही मालिका नव्या कलाकारांसह प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय एकतानं काही महिन्यांपूर्वी जाहीर केला.

या मालिकेत टेलिव्हिजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री एरिका फर्नांडिस प्रेरणाची भूमिका साकारणार आहे. तर ‘कैसी हे यारीयाँ’ फेम पार्थ या मालिकेत अनुरागची भूमिका साकारणार आहे. या व्यतिरिक्त छोट्या पडद्यावरची ‘आदर्श सून’ हिना खान या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

एकतानं आधीच्या टायटल ट्रॅकमध्ये फार बदल न करता ते प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. त्यामुळे १७ वर्षांपूर्वी आलेल्या या मालिकेला पुन्हा प्रेक्षकांचा तितकाच भरभरून प्रतिसाद मिळतो का हे पाहण्यासारखं ठरेल.