पश्चिम बंगालमध्ये दूर्गा पूजा हा सण मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला जातो. दूर्गा पूजेचे महापर्व सुरु होण्यापूर्वीच प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये नुसरत आणि मिमी चक्रवर्ती दुर्गा पूजेनिमित्त तयार करण्यात आलेल्या एका गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

या गाण्याचे नाव ‘असे माँ दुर्गा से’ असे असून गाण्यामध्ये बंगालमधील पारंपरिक नृत्य प्रकार सादर करण्यात आला आहे. नुसरत आणि मिमी यांच्यासह बंगालमधील लोकप्रिय अभिनेत्री सुभाश्री गांगुलीदेखील डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमधील या तिघींचा डान्स पाहण्यासारखा आहे. दरम्यान तिघींनीही बंगाली पारंपरिक साड्या नेसल्या असून त्यावर सुंदर दागिने परिधान केले आहेत.

‘असे मॉं दूर्गा शे’ हे गाणे बंगालमधील दूर्गा पूजेसाठी खास तयार करण्यात आले आहे. हे गाणे टॉलिवूड संगीत दिग्दर्शक इंद्रदीप दास गुप्ताने तयार केले आहे. तसेच बाबा यादव यांनी नृत्य दिग्दर्शन केलं असून गाण्यात बंगालमधील लोकनृत्य छऊचंही सादरीकरण करण्यात आले आहे. ४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या दूर्गा पूजा उत्सवादरम्यान या गाण्याच्या माध्यमातून एक मोहीमेचं प्रमोश करण्यात येणार आहे.