बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा ‘रुस्तम’ हा आणखी एक वास्तवदर्शी चित्रपट येऊ घातला आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, अक्षय कुमार चित्रपटात एका नौदल अधिकाऱयाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मुंबईतील गाजलेल्या नानावटी प्रकरणावर ‘रुस्तम’ या चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटात अक्षयच्या भूमिकेचं नाव रुस्तम पावरी असून, रुस्तमवर विक्रम मखिजा या पत्नीच्या प्रियकराच्या हत्येचा आरोप असतो. विक्रम मखिजाच्या हत्याप्रकरणाला मिळणारे रंजक वळण, चौकशीचा ससेमिरा आणि भावनेची लाट यावर चित्रपटाचे कथानक अवलंबून आहे. चित्रपटात अक्षयच्या पत्नीची भूमिका इलियाना डिक्रूझ पाहायला मिळणार आहे. याशिवाय चित्रपटात सचिन खेडेकर, एशा गुप्ता, उषा नाडकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.