काळ कितीही पुढे गेला किंवा कितीही नवनवीन गोष्टी ट्रेंडमध्ये आल्या तरीही काही गोष्टींप्रती असणारी ओढ मात्र कमी होत नाही. चित्रपटांच्या बाबतीतही असंच आहे. आजवर या कलाविश्वात बऱ्याच चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्याचं आपण पाहिलं. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे ९० च्या दशकात आलेला ‘कुछ कुछ होता है’. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाने मैत्री आणि प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात असं जणू तेव्हाच्या तरुणाईच्या मनावर बिंबवलं होतं. हा चित्रपट आणखी एका कारणासाठी गाजला, ते कारण म्हणजे चित्रपटातील गाणी.

जतिन- ललित या तत्कालीन प्रसिद्द संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेली गाणी आजही तितकीच लोकप्रिय असून, नुकतीच या चित्रपटाच्या शिर्षकगीताची दखल बर्लिन येथील चित्रपट महोत्सवात घेण्यात आली आहे.

वाचा : पुरुष कलाकारांनी कमी मानधन आकारावं- दीपिका पदुकोण

the Stuttgart Chamber Orchestra द स्टटरागार्ट चेंबर या जर्मन ऑर्केस्ट्राने (वाद्यवृंदाने) ‘तुम पास आए… यू मुस्कुराए’ या गाण्यावर सुंदर सादरीकरण करत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला. या गाण्याची धुन अनोख्या आणि तितक्याच प्रभावी पद्धतीने सादर करणाऱ्या या वाद्यवृंदाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही फारच कमी वेळात व्हायरल झाला आणि करण जोहरपर्यंतही पोहोचला. ‘मी हे गाणं कसं सादर होतं हे पाहण्यासाठी फारच उत्सुक होतो’, असं ट्विट करत करणनेही त्याचा आनंद व्यक्त केला. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाची लोकप्रियता इतक्या वर्षांनंतरही कायम आहे हे खरं.