पंजाबी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख प्रस्थापित केल्यानंतर गायक, अभिनेता दिलजीत दोसांजने त्याचा मोर्चा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळवला. ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या माध्यमातून दिलजीतने प्रेक्षकांनी मनं जिंकली आणि त्याच बळावर त्याच्या वाट्याला आणखी एक चित्रपट आला. हॉकीपटू संदीप सिंगच्या आयुष्यावर आधारित सूरमासाठी त्याची निवड करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता त्यामागोमाग चित्रपटातील नवं गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘इश्क की बाजियाँ’ असे या गाण्याचे बोल असून, गुलजार यांच्या लेखणीतून उतरलेलं हे गाणं खुद्द दिलजीतनेच गायलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने पंजाबच्या एका खेड्यात खुलणाऱ्या प्रेमकहाणीचं चित्रण पाहायला मिळत आहे. त्यासोबतच तापसी पन्नू आणि दिलजीत दोसांज यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. आपल्या आयुष्यात येणारी हक्काची आणि प्रेमाची व्यक्ती ही फक्त प्रेम करण्यापुरताच नव्हे तर आयुष्याच्या प्रत्येक वळणांवर येणाऱ्या अडीअडचणीच्या वेळीसुद्धा तितकीच महत्त्वाची असते, या भावनेचं सुरेख चित्रण केल्याचं गाण्यातून पाहायला मिळत आहे.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

प्रेमाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देऊन जाणाऱ्या अवघ्या दोन मिनिटांच्या या गाण्याची चालही अगदी संथ असून, ती काळजाचा ठाव घेत आहे. शाद अली दिग्दर्शित ‘सूरमा’ या चित्रपटातून संदीप सिंगच्या संघर्षगाथेवर प्रकाशझोत टाकण्यात आला असून, देशातील राष्ट्रीय खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या वाट्याला नेमक्या कोणत्या अडचणी येतात, त्यांची वाट किती खडतर असते याचं प्रत्ययकारी चित्रण करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा क्रिकेटला राजाश्रय मिळालेल्या आपल्या देशात या ‘सूरमा’ हॉकिपटूची गाथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.