23 November 2017

News Flash

महिलांची मानसिकता मांडणारा ‘सोनाटा’चा ट्रेलर प्रदर्शित

..या आहेत शबाना आझमी, अपर्णा सेन आणि लिलेट दुबेच्या तीव्र इच्छा

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 20, 2017 6:42 PM

छाया सौजन्य- युट्यूब

रोमॅण्टिक आणि मसालेदार कथानकाच्या चित्रपटांनाच हल्लीचा प्रेक्षकवर्ग पसंती देतो, असा अनेकांचाच समज आहे. पण, काही चित्रपट मात्र याला अपवाद ठरतात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे अपर्णा सेन यांचा ‘सोनाटा’. अपर्णा सेन, शबाना आझमी आणि लिलेट दुबे यांच्या अभिनयाने सजलेला ‘सोनाटा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. महिलाप्रधान चित्रपट असणाऱ्या ‘सोनाटा’चा ट्रेलर सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

तीन वयस्कर महिलांच्या जीवनाभोवती या चित्रपटाचे कथानक फिरणार असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने अनेकांचेच लक्ष वेधले आहे. या ट्रेलरमध्ये सर्वच कलाकारांचे अभिनय प्रशंसनीय आहेत. अपर्णा सेन, शबाना आझमी आणि लिलेट गुप्ता यांच्या अभिनयाची सुरेख झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. हातातील वाइनच्या ग्लासपासून ते अगदी एखाद्या तरुणीप्रमाणे या अभिनेत्रींनी व्यक्त केलेल्या तीव्र इच्छांपर्यंत सर्व काही ट्रेलरमध्ये मांडण्यात आले आहे.

अपर्णा सेन दिग्दर्शित हा चित्रपट महेश एलकुंचवारांच्या नाटकावर आधारित असून, यामध्ये तीन महिलांच्या भोवती फिरणारे वेगळ्या धाटणीचे कथानक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अविवाहित असलेल्या अरुणा चतुर्वेदी (प्राध्यापिका), डोलोन सेन (बॅंकर) आणि सुभद्रा पारेख (पत्रकार) या महिलांचे विश्व साकारण्यात येणार आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर चांगलाच गाजत असून बॉलिवूड सेलिब्रिटींनीही त्याची प्रशंसा केली आहे. ऋषी कपूर, ट्विंकल खन्ना, फरहान अख्तर, करण जोहर यांनी ट्विटरद्वारे या ट्रेलची प्रशंसा केली आहे.

ट्रेलरमध्ये शबाना आझमी यांनी साकारलेली बिनधास्त भूमिका, अपर्णा सेन यांनी साकारलेली घरंदाज महिलेची भूमिका आणि लिलेटने साकारलेली प्रियकराची मारझोड सहन करणाऱ्या एका महिलेची भूमिका पाहता ‘सोनाटा’बद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

First Published on March 20, 2017 6:42 pm

Web Title: watch video shabana azmi in aparna sens sonata exploring modern day womans psychology