भारतीय संस्कृतीकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन इतका व्यापक का आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वेळोवेळी मिळत असतं. सर्वच बाबतीत समृद्ध असणाऱ्या आपल्या देशात काही पारंपरिक नृत्यप्रकारांचंही मोठं प्रस्थ आहे. विविध भागांमध्ये प्रचलित असणाऱ्या या नृत्यप्रकारांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध नृत्यप्रकार म्हणजे कथ्थक. हिप हॉप आणि ब्रेक डान्सच्या जमान्यातही नजाकत आणि अदा या महत्त्वाच्या घटकांना अधोरेखित करणाऱ्या कथ्थक नृत्यप्रकाराचा सुरेख नमुना सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

कथ्थक नृत्यामुळे प्रसिद्धी मिळालेल्या कुमार शर्मा आणि स्वेतलाना तुलसी या जोडीने पुन्हा एकदा आपल्या नृत्याविष्काराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अदनान सामीने गायलेल्या ‘ये जमीं रुक जाए’, या सुमधूर गाण्यावर कथ्थक नृत्य सादर करत कुमार आणि स्वेतलानाने आपल्या कलेचा नजराणा सादर केला.

पाहा : VIDEO: बर्लिनकरही म्हणाले ‘कुछ कुछ होता है’

कुमारने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केलेला या व्हिडिओ २५ हजारहून जास्त युजर्सनी लाइक केला असून, अनेकांनी तो शेअरही केला आहे. मुख्य म्हणजे खुद्द अदनान सामीलाही हा नृत्याविष्कार भावला असून, त्यानेही या दोन्ही कलाकारांची प्रशंसा केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच कलाकारांनी यश संपादन केलं आहे. कुमार आणि स्वेतलाना ही नावंसुद्धा त्यातीलच आहेत. कुमार नेहमीच त्याच्या फेसबुक पेजवरुन काही व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्यामुळे कलेला तंत्रज्ञानाची जोड देत खऱ्या अर्थाने तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला आहे हे नाकारता येणार नाही.