‘विटी दांडू’ हा अजय देवगणची प्रस्तुती असलेल्या ‘विटी दांडू’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर अजयच्या ‘सिंघम रिटर्न्स’सोबत चित्रपटगृहात दाखविण्यात येत आहे. ‘विटी-दांडू’ या शीर्षकामुळे बहुकांच्याच मनात कुतूहल निर्माण झाले असेल. विटी-दांडू हा खेळ हल्लीची बच्चेकंपनी खेळत नाही; परंतु ज्या लोकांनी हा खेळ आवडीने खेळला असेल त्यांना शाळुसोबत्यांबरोबर विटी-दांडू खेळण्याच्या मजेची आठवण मात्र चित्रपटाच्या शीर्षकामुळे नक्कीच जागी होते.
‘विटी-दांडू’ या चित्रपटातून आजोबा-नातू यांच्या माध्यमातून आजच्या बच्चेकंपनीला निसर्गाच्या सान्निध्यात राहून नदीत डुंबणे असो, झाडावर चढणे असो की रानोमाळ भटकणे असो, विस्मृतीत गेलेल्या अशा अनेक खेळांची गंमत पडद्यावरून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  ‘विटी-दांडू’ हा चित्रपट ‘पीरिएड फिल्म’ या चित्रपट प्रकारातला आहे; परंतु चित्रपटाची सुरुवात आजच्या काळात होते आणि मग संपूर्ण चित्रपट ‘फ्लॅशबॅक’मध्ये घडतो. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, रवींद्र मंकनी, यतीन कार्येकर, मृणाल ठाकूर आणि अशोक समर्थ आदींची भूमिका असणार आहे. बालकलाकाराच्या भूमिकेत राधिका देवरे, निशांत भावसार, शुभंकर आत्रे पाहायला मिळणार आहेत. दिग्दर्शक गणेश कदमने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.