‘कौन बनेगा करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी अखेर सोनी वाहिनेने माफी मागितली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अनावधानाने आमच्याकडून एक चूक झाली. त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करत आहोत,” असं सोनी वाहिनेनं म्हटलं आहे. आम्ही चूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच टीव्हीवर यासंदर्भात माफी मागितली होती असं सोनी वाहिनीने स्पष्ट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या केबीसीच्या ११ व्या पर्वातील भागामध्ये एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता. गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर असताना त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले. यामध्ये महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि शिवाजी असे पर्याय देण्यात आले होते. यावरुन सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा रंगली. ट्विटरवरही शुक्रवार सकाळपासूनच अनेकांनी शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोनी वाहिनीवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. अनेकांनी हा हिंदू राजाचा अपमान सहन केला जाणार नाही असं म्हटलं होत. #Boycott_KBC_SonyTv हा हॅशटॅग भारतामध्ये ट्विटवर नवव्या क्रमांकाला ट्रेण्ड होत होता. हा हॅशटॅग वापरून हजारो ट्विटस नेटकऱ्यांनी केल्यानंतर सोनी वाहिनीने सोशल नेटवर्किंगवरुन जाहीर माफी मागितली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अनावधानाने आमच्याकडून बुधवारच्या भागामध्ये एक चूक झाली. त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करत आहोत. आमच्या प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेता यासंदर्भातील आम्ही कालच्या (गुरुवारच्या) भागादरम्यान माफी मागण्यासंदर्भातील स्क्रोल चालवा होता.,” असं ट्विट ‘सोनी वाहिनी’च्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आले आहे. याबरोबरच हा माफीचा स्क्रोल फरणारे कार्यक्रमातील व्हिज्युअल्स असणारा व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन अमिताभ बच्चन, सोनी वाहिनी, मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडने केली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस स्थानकामध्ये यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने अर्जही दिल्याचे समजते. आता ‘सोनी’ने माफी मागितल्यानंतर संभाजी ब्रिगेड हा अर्ज मागे घेणार का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We deeply regret for mistake says sony tv after controversy over chatrapati shivaji maharaj scsg
First published on: 08-11-2019 at 13:16 IST