मराठीत सध्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट सादर होत असून या चित्रपटांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद केवळ मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरी भागात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लहान-मोठय़ा शहरांमधून आहे. महाराष्ट्रात बहुसंख्येने मराठी भाषक मंडळी असल्याने त्यांचा प्रतिसाद अपेक्षित आहे. पण, गेली अनेक वर्षे परदेशात राहिलेल्या मराठी मंडळींनी मराठी चित्रपटाला प्रतिसाद देणे ही बाब विशेष म्हटली पाहिजे. या मंडळींनी ‘आम्ही बोलतो मराठी’ या आगामी चित्रपटाचे खेळ अमेरिकेत विविध ठिकाणी आयोजित केले होते.   
प्रत्येक माणसालाच आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो. अमेरिकेत राहणाऱ्या मराठी भाषकांनीही ‘आम्ही बोलतो मराठी’ या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ते दाखवून दिले आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर नुकताच अमेरिकेत झाला. येत्या १२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
अमेरिकेतील शिकागो, फिलाडेल्फिया, पिटस्बर्ग, डेट्रॉईट, न्यू जर्सी, बाल्टीमोर येथील महाराष्ट्र मंडळांनी या चित्रपटांचे खेळ अमेरिकेत आयोजित केले होते. ‘केवळ जन्माने मराठी असू नका मनाने मराठी व्हा’ असा विचार या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती सर्व गाणी मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्व सांगणारी आणि दर्शन घडविणारी आहेत. अमेरिकेत विविध ठिकाणी झालेल्या चित्रपटाच्या खेळांना चित्रपटातील मुख्य कलाकार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आनंद म्हसवेकर उपस्थित होते. चित्रपटाचा खेळ झाल्यानंतर या दोघांशी उपस्थित मराठी बांधवानी मराठी भाषा, संस्कृती, मराठी चित्रपट आणि नाटक या विषयावर संवाद साधला. चित्रपटातील ‘हा ध्यास मराठीसाठी’ आणि ‘कहो गर्वसे हम मराठी’ ही गाणी मराठी भाषेचे महत्व सांगणारी आहेत. चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासह अरुण नलावडे, सविता प्रभुणे, शैलेश दातार, सक्षम कुलकर्णी, भाऊ कदम आदी कलाकार आहेत.