‘पद्मावती’ सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या दीपिका पादुकोणला आता राजपूत करणी सेनेने धमकी दिली आहे. ‘ज्याप्रमाणे लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते, त्याप्रमाणे करणी सैनिकही तुझे नाक कापू शकतात’, असा इशाराच करणी सेनेचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष महिपाल मकराणा यांनी म्हटले.

काहीही झाले तरी ‘पद्मावती’ सिनेमा ठरलेल्या तारखेलाच प्रदर्शित केला जाईल या दीपिकाच्या वक्तव्यावर महिपाल यांनी ही धमकी दिली. काही राज्यांमध्ये पद्मावती सिनेमा प्रदर्शित करु न देण्याचे म्हटले जात असताना दीपिकाने काल एका मुलाखतीत या सिनेमाचे प्रदर्शन कोणीही रोखू शकत नसल्याचे म्हटले होते.

दीपिकाने म्हटले होते की, ‘आम्ही ज्यांना उत्तर द्यायला बंधनकारक आहोत ते फक्त सेन्सॉर बोर्ड आहे. मला माहीत आहे आणि ठाम विश्वासही आहे की, या सिनेमाचे प्रदर्शन कोणीही अडवू शकत नाही.’ सिनेमाबद्दल बोलताना दीपिका हेही म्हणाली की, ‘हे फक्त पद्मावती सिनेमापूरते मर्यादित नाहीये. आम्ही सिनेमाहून अधिक मोठी लढाई सध्या लढत आहोत.’

करणी सेनेने फक्त दीपिकालाच धमकी दिली नाही तर, सिनेमा प्रदर्शित झाल्यास १ डिसेंबर रोजी भारत बंदचा इशाराही दिला असून फक्त राजपूत समाजच नव्हे तर हिंदू आणि मुस्लिमही या सिनेमाच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले. या सिनेमाचे ट्रेलर ज्या चित्रपटगृहांत दाखवले जातील, तिथे जाळपोळ करु, अशी धमकीच त्यांनी दिली आहे.

दरम्यान, सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान भन्साळी यांना करणी सेनेने धक्काबुक्की केली होती. या पार्श्वभूमीवर भन्साळी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सिनेनिर्मात्यांच्या असोसिएशनने महाराष्ट्र सरकारकडे केली होती. बुधवारी भन्साळी यांचे निवासस्थान, कार्यालयाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.