अभिनेता सलमान खान याने आपल्या वाढदिवशी लाँच केलेली खानमार्केटऑनलाईन डॉट कॉम ही वेबसाईट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दिल्लीतील प्रसिद्ध खान मार्केट व्यापारी संघटनेने या वेबसाईटच्या नावावर आक्षेप घेतला असून, त्याविरोधात गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारीही केली आहे.
सलमान खान याने आपल्या वाढदिवशी २७ डिसेंबर रोजी खान मार्केट ऑनलाईन या वेबसाईटची सुरूवात केली होती. त्यावर चाहत्यांना नोंदणीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वेबसाईटवर विविध ऑफर्स देण्यात येणार आहेत. मात्र, त्याच्या नावावरून वादाला तोंड फुटले आहे. दिल्लीमध्ये प्रसिद्ध असलेल्या खान मार्केटमधील व्यापारी संघटनेने या नावाला आक्षेप घेतला आहे. संघटना या वेबसाईटविरोधात न्यायालयात जाण्याच्याही तयारीत आहे. या संदर्भात खान मार्केट संघटनेचे प्रमुख संजीव मेहरा म्हणाले, आम्ही न्यायालयात जाण्याअगोदर सलमान खानचे मन वळविण्यासाठी प्रयत्न करू. खान मार्केट हे नाव त्याने वापरू नये, यासाठी आम्ही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहोत.
दरम्यान, ही वेबसाईट प्रकाशित झाल्यानंतर अनेकांनी त्यावर नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरही या नावाची खूप प्रसिद्धी झाली आहे. त्यामुळे आता या वेबसाईटचे नाव बदलण्याचा निर्णय घेणे अत्यंत कठीण ठरणार आहे. सलमान खान त्यावर काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.