शरीरविक्रीसाठी होणाऱ्या मानवी तस्करीच्या मुदद्याला हाताळात ‘भारतीय डिजीटल पार्टी’ आणि ‘कल्चर मशिन’ या दोन्ही वेब चॅनल्सनी एकत्र येत एक लक्षवेधी व्हिडिओ साकारला आहे. ‘अमोली…प्राइजलेस’, असं या व्हिडिओचं नाव असून नुकताच याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सोशल मीडियावर अनेकांची पसंती असणाऱ्या ‘भाडीप’ आणि ‘कल्चर मशिन’ या दोघांच्याही टीमने मिळून एक दाहक वास्तव या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांससोमर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘फोन करतात मुलगी पाहिजे…. माल पाठवून द्या’, या लक्षवेधी संवादाने ‘अमोली’च्या टीझरची सुरुवात होते. तर जवळपास अवघ्या दीड मिनिटांचा हा व्हिडिओ जसजसा पुढे जातो, तसतसा समाजाचा कधीही न पाहिलेला चेहरा आपल्या मनात कालवाकालव करुन जातो. या व्हिडिओतून मानवी तस्करी आणि त्यातही देहविक्रीसाठी लहान मुलींचा केला जाणारा वापर, यासंबंधीची काही आकडेवारीसुद्धा दाखवण्यात आली आहे. जी पाहता आपल्या देशात इतकं काहीतरी चुकीचं घडत असल्याची अनुभूती मन हेलावूट टाकते.

वाचा : ऑलिम्पिक पदकाचा वेध घेण्याचे स्वप्न!

बऱ्याच चित्रपटांमधून आणि माहितीपटांतून याआधीही या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण, हा व्हिडिओ त्यातही खऱ्या अर्थाने आपलं वेगळेपण सिद्ध करत आहे. ‘मोठी आणि श्रीमंत लोकं या व्यवसायात म्हणजेच मानवी तस्करीमध्ये पैसे गुंतवतात. कारण त्यांना ठाऊक आहे की या व्यवसायात पैसा बुडत नाही’, अशा आशयाची वाक्य कधीही डबघाईला न जाणाऱ्या एका घाणेरड्या व्यवसायाशी सर्वांचीच ओळख करुन देतात. मानवी तस्करीच्या विळख्यात आजवर किती लहान मुलींना आपलं आयुष्य, अस्तित्व पणाला लावावं लागलं आहे, याचा अंदाज हा काही मिनिटांचा टीझर पाहून लावता येत आहे. ७ मे रोजी ‘अमोली… प्राइजलेस’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता हा भडका उडाल्यानंतर त्यातून आणखी कोणती विदारक माहिती सर्वांसमोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.