बहुप्रतिक्षीत ठरत असलेल्या ‘मिर्झापूर 2’ चा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील अनेक संवाददेखील गाजले. मात्र, आता सोशल मीडियावर उलट-सुलट मीम्सला उधाण आलं आहे. इतकंच नाही तर ‘मिर्झापूर 2’ बॉयकॉट करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यामध्येच अभिनेता दिव्येंदू शर्मा याने एका मुलाखतीत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसंच हा निव्वळ मुर्खपणा आहे असंही तो म्हणाला आहे.

‘मिर्झापूर’ या सीरिजमध्ये दिव्येंदू शर्मा याने मुन्ना त्रिपाठी ही भूमिका साकारली आहे. तसंच या सीरिजच्या दुसऱ्या भागात म्हणजे ‘मिर्झापूर 2’ मध्येदेखील दिव्येंदू शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मात्र, ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेकांनी त्याला विरोध केला आहे. सोबतच या सीरिजवर बॉयकॉटची मागणी केली आहे. यावर दिव्येंदू शर्माने त्याचं मत नोंदविलं आहे.

“सध्या जे काही घडतंय त्याची मला खरंच काही चिंता नाहीये. कारण या विरोधकांना माहितच नाही की तेच अडचणीत सापडत आहे. मिर्झापूरवर प्रेम करणारे खूप जण आहेत. त्यामुळे उगाच ट्रोल करणाऱ्यांनी त्यांचा मुर्खपणा थांबवला पाहिजे. सध्या जे काही हॅशटॅग व्हायरल होत आहेत, तो निव्वळ मुर्खपणा आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे मिर्झापूरवर प्रेम करणारे किती लोक आहेत. पैसे देऊन करण्यात येणारे हे ट्रेण्ड खरंच आधारहिन आहेत. या लोकांची मला खरचं दया येते”, असं दिव्येंदू म्हणाला.

दरम्यान,या सीरिजमध्ये गुड्डू पंडितची भूमिका साकारणाऱ्या अली फैजलने सीएए विरोधी आंदोलनात भाग घेतला होता. त्यामुळे कोणत्याही देशप्रेमी व्यक्तीने मिर्झापूरचा नवा सिझन पाहू नये, असे आवाहन करणारी ट्विट्स बॉयकॉट ‘मिर्झापूर’ या हॅशटॅगसह केली जात आहेत. अली फैजलने रिया चक्रवर्तीला अनेकदा मदत केली आहे, त्यामुळे त्याची भूमिका असलेल्या सिरीजवर बहिष्कार टाकावा. असा सल्ला अनेकांनी दिला आहे. ट्रेलर रिपोर्ट करण्याचे आवाहनही काहींनी केले आहे. अभिनेता अली फैजल आणि सीरिजचा निर्माता फरहान अख्तर यांचे छायाचित्र व त्यावर ‘शुरू मजबुरी में किया था, अब मजा आ रहा हैं’ हा ‘मिर्झापूर’च्या पहिल्या सिझनमधील डायलॉग असलेली मिम्स व्हायरल झाली आहेत.