‘मिर्जापुर २’ नंतर ओटीटी प्लॅटफॉर्वर जर कोणत्या वेब सिरीजसाठी प्रेक्षकांनी प्रतिक्षा केली असेल तर ती म्हणजे अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरची ‘द फॅमिली मॅन’ ही होय. प्रेक्षकांची ही प्रतिक्षा गेल्या १२ फेब्रूवारीलाच संपली असती. परंतू गेल्या जानेवारीमध्येच रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेब सिरीजवरून राजनैतिक विवाद सुरू झाल्यामुळे ‘द फॅमिली मॅन’ च्या मेकर्सना दुसऱ्या सीजनचे प्रदर्शन थांबवावे लागले होते.

‘द फॅमिली मॅन’ वेब सिरीज कधी रिलीज होणार, याबाबत आतापर्यंत केवळ अंदाज बांधले जात होते. परंतू फॅन्सची प्रतिक्षा अखेर संपली आहे. कारण या बहूप्रतिक्षित वेब सिरीजच्या रिलीजबाबत अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने अधिकृत घोषणा केली आहे. ‘द फॅमिली मॅन २’ या सिरीजचा ट्रेलर उद्या म्हणजेच १९ मे रोजी रिलीज होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. यात त्यांनी ‘द फॅमिली मॅन २’ चे दोन नवे पोस्टर देखील शेअर केले आहेत. परंतू हा ट्रेलर नक्की किती वाजता रिलीज होईल, याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

ही पोस्ट शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “काही तरी वेगळं होणारंय…असं की ज्याचा आपण विचार देखील केला नसेल..ट्रेलर उद्या येतोय…”, असं लिहित अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवलीय. यासोबतच शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्यासोबत पहिल्यांदाच अभिनेत्री सामंथा अक्कीनेनीला दाखवण्यात आलंय. ‘द फॅमिली मॅन’च्या या दुसऱ्या सीजनमध्ये सामंथा अक्कीनेनी मुख्य खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मनोज वाजपेयी याच्यासोबत शारिब हाशमी, प्रियामणि, श्रेया धन्वंतरि, सनी हिंदूजा, शाहब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकुर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

छोट्या-मोठ्या कट्सनंतर पास झाला सीजन २
गेल्या जानेवारी महिन्यात अभिनेता सैफ अली खानची ‘तांडव’ ही वेब सिरीज रिलीज झाल्यानंतर जो विवाद सुरू झाला होता तो पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला. त्यानंतर अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने याचा धडा घेत त्यांचे अधिकारी सतर्क झाले आहेत. ‘द फॅमिली मॅन २’ मध्ये सुद्धा जर काही विवादात्मक सीन किंवा संवाद असतील त्यांना रिलीजपुर्वीच काढून टाकण्याचा निर्णय अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या टीमने घेतला. अखेर डोळ्यात अक्षरशः अंजन घालून सिरीजमधील अनेक चेक पॉईंट्सना पार केल्यानंतर ‘द फॅमिली मॅन २’ ही सिरीज रिलीज करण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘द फॅमिली मॅन २’ ला अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या टीमने कोणतेही सीन कट न करता सिरीजला क्लीन चिट दिली आहे. पंरतू थोड्या फार प्रमाणात छोटे-मोठे बदल करण्यात आले आहेत. पुन्हा आणखी दुसऱ्या कोणत्या वादात अडकण्याची वेळ येऊ नये आणि राजनैतिक विवाद निर्माण होऊ नये म्हणून अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या टीमने सिरीजमधील एक एक सीन बारकाईने तपासले आहेत. अभिनेता मनोज वाजपेयी याने देखील त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत याबाबत खात्री दिली आहे.

4 जूनला रिलीज होणार ‘द फॅमिली मॅन’ सीजन २ ?
अभिनेता मनोज वाजपेयी याने ‘द फॅमिली मॅन’ सीजन २ च्या रिलीजबाबतही माहिती दिली आहे. ही सिरीज ११ जूनमध्ये रिलीज होईल, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. परंतू आता मिळालेल्या माहितीनुसार ही सिरीज ४ जूनला ओटीटी प्लॅटफॉर्वर रिलीज करण्यात येईल, असं कळतंय. याची अधिकृत घोषणा उद्या रिलीज होणाऱ्या ट्रेलरमधूनच होणार आहे.