News Flash

चित्र रंजन : प्रत्येकाच्या ‘मनातली गोष्ट’

परीच्या प्रेमात पडलेला सासवडचा मुलगा प्रकाश (शिवराज वायचळ) साध्या स्वभावाचा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती परब

वेडिंगचा शिनेमा

आयुष्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. काहीतरी वेगळं म्हणजे काय, हे उलगडण्याच्या टप्प्यावर समोर उभे ठाकणारे घटना-प्रसंग, विविध स्वभावाची माणसं आपल्या वेगळं काही करण्याच्या मानसचित्रात रंग भरू लागतात. मग हेच की आपल्या सुखाचं मानसचित्र! हे एका वळणावर आपल्यालाही कळून चुकतं. ‘‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटातील उर्वीच्या व्यक्तिरेखेच्या बाबतीत असंच घडतं.

तिने चित्रपट माध्यमाचं शिक्षण घेतलंय. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला जाईल, असा चित्रपट तिला करायचा आहे. दिग्दर्शिका म्हणून तिचं हे मानसचित्र आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्याची वाट सोपी नाहीय. त्याआधी तिला ‘प्रिवेडिंग फिल्म’ करणं, नाइलाजानं स्वीकारावं लागतं.

ती नाखुशीनेच सासवडला येते. तिथे तिला परी-प्रकाश, शहाणे कुटुंबीय नंतर इनामदार कुटुंबीय भेटतात. जशी उर्वीला दर्जेदार कलाकृती करण्याची इच्छा असते, तसंच परीला (ऋचा इनामदार) तिची ‘प्रिवेडिंग फिल्म’ इतरांपेक्षा वेगळी, भन्नाट करून हवी असते.

परीच्या प्रेमात पडलेला सासवडचा मुलगा प्रकाश (शिवराज वायचळ) साध्या स्वभावाचा आहे. काहीसा बुजरा आहे. घरच्यांच्या धाकात आहे. प्रेम व्यक्त करायलाही तो घाबरत असतो. त्यामुळे पुढाकार परीच घेते. एकीकडे यांच्या प्रेमाची गोष्ट उलगडली जात असताना दुसऱ्या बाजूला उर्वी चित्रीकरणाच्या निमित्ताने परी आणि प्रकाशच्या घरच्यांशी संवाद साधते. त्यांच्याशी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांवरही चर्चा करते. या चर्चेत प्रकाशच्या आई (अलका कुबल) बरोबरचे दोन प्रसंग उत्तम रंगले आहेत. प्रकाशच्या आईकडून उर्वीला करिअर वुमनच्या बाबतीतला एक दृष्टिकोन मिळतो. परी-प्रकाशला विनोदी किंवा वेडे वाटलो तरी चालेल, पण आखीव-रेखीव चित्रीकरण नको असतं. त्यामुळे उर्वीने लिहून आणलेल्या संवादांना ते नाही म्हणतात आणि धमाल करत चित्रीकरण करायचं ठरवतात. त्यांचा हा वेडेपणा बघून उर्वीलाही आपल्या प्रियकराची आठवण होते. तिला त्याचा अधून-मधून फोन येतो. पण ती त्याच्याशी नेहमी तुटकच बोलते. तिला वाटतं, आपण काहीतरी वेगळं केल्यावर एका योग्य वळणावर लग्नाचा निर्णय घेऊ . पण दुसरीकडे तिला करिअरचीही चिंता सतावते आहे. यामुळे सुरुवातीला ती मोकळेपणाने चित्रीकरणादरम्यान सगळ्यांमध्ये मिसळत नाही. परंतु हळूहळू तिची परीशी, प्रकाशच्या घरातील विविध स्वभावाच्या माणसांशी गट्टी होते. त्यामुळे तिची नकारात्मक भावना कमी होत जाते. त्यामुळेच परी-प्रकाशच्या लग्नाची पत्रिका देवीच्या मंदिरात ठेवायला गेल्यावर तिथे देवीचा गोंधळ सुरू असतो. त्यात ती परीबरोबर नृत्यात सहभागी होते. आधी चिडचिडी असलेली उर्वी या गोंधळाच्या दृश्यानंतर ‘प्रिवेडिंग फिल्म’च्या निमित्ताने भेटलेल्या इनामदार-शहाणे कुटुंबीयांकडून नकळतपणे शिकलेल्या गोष्टी आपल्याही आयुष्यात आजमावू लागते.

प्रकाशच्या आईचं परी-प्रकाशबद्दल बोलणं, परीच्या आई-वडिलांचं परीबद्दल बोलणं या प्रसंगात उर्वीसुद्धा हळवी होती. दिग्दर्शिका म्हणून चांगली कलाकृती करायची आहे, हे आपलं मानसचित्र पूर्ण करताना आयुष्यातील कित्येक क्षण भरभरून जगायचे आपण विसरतोय, हे तिच्या लक्षात येतं.

लग्नानंतर सासवड की मुंबई? हा प्रश्न परी-प्रकाशच्या नात्यात वाद निर्माण करतो, तसंच उर्वीलाही विचार करायला लावतो. लग्नानंतर करिअरला प्राधान्य दिल्यावर कुटुंबासाठी करायच्या कित्येक गोष्टी करता येत नाहीत. काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. ही चिंता करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना हमखास सतावते. पण प्रकाशच्या आईशी बोलण्यातून, परी-प्रकाशचं भांडण मिटण्यातून आणि परीच्या आईचं परीला आणि परीच्या बाबांना सॉरी म्हणण्यातून उर्वीचाही ताण हलका होतो.

चित्रपटात कुणी नकारात्मक व्यक्तिरेखा नाही. व्यक्तिरेखांच्या प्रवासातील चढ-उतारच खलनायकाची जागा घेतात. एक-दोन प्रसंग वगळता धमाल विनोदी वातावरण प्रवाही राखण्यात दिग्दर्शक सलील कुलकर्णी यशस्वी झाले आहेत. दिग्दर्शकीय पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ‘सिनेमातला सिनेमा’ चित्रित करताना उर्वीच्या व्यक्तिरेखेतून प्रत्येकाच्या ‘मनातली गोष्ट’ उलगडण्याची किमया उत्तम साधली आहे.

नृत्य शिकवायला आलेल्या जम्बोंची व्यक्तिरेखा आणि काही प्रसंगांत परीची व्यक्तिरेखा बेगडी वाटते. शिवराज वायचळ, अलका कुबल, शिवाजी साटम, संकर्षण कऱ्हाडे, प्रवीण तरडे, प्राजक्ता हणमगर, भाऊ  कदम, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा उठून दिसतात. सहज संवादी मांडणीतून विनोद उत्तम खुलला आहे. गाणीही त्याला साजेशी आहेत. चित्रपटाच्या शेवटी उर्वीच्या प्रियकराचं येणं, हाही प्रेक्षकांसाठी सुखद धक्का आहे.  सुरुवातीला नाखुशीने प्रिवेडिंग फिल्म करणारी उर्वी चित्रपटाच्या शेवटाकडे येताना तिला तिच्या सुखाचं मानसचित्र प्रत्यक्षात दिसू लागतं. प्रिवेडिंग फिल्म, त्यानंतर तिच्या आवडीची कलाकृती करायला मिळणार असल्याचा आणि प्रियकराशी पुन्हा सूर जुळल्याचा आनंद मुक्ता बर्वेने अप्रतिम अभिव्यक्त केलाय. तिच्या व्यक्तिरेखेचा प्रवास प्रेक्षकांना आपलाच प्रवास वाटू लागतो. काहीतरी वेगळं करणं ही प्रत्येकाच्याच मनातली गोष्ट आहे. हा चित्रपट ती ‘मनातली गोष्ट’ अलवार उलगडतो.

* दिग्दर्शक- सलील कुलकर्णी

* कलाकार- मुक्ता बर्वे, ऋचा इनामदार, शिवराज वायचळ, अलका कुबल, शिवाजी साटम, संकर्षण कऱ्हाडे, प्रवीण तरडे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 12:17 am

Web Title: wedding cha shinema martathi movie review
Next Stories
1 चित्ररंजन : एक ना धड..
2 रात्रीस खेळ चाले : सरिताला अण्णा घराबाहेर काढणार का?
3 मी सामान्य वकुबाचा कलाकार, चाहत्यांनी तारलं – सलमान खान
Just Now!
X