News Flash

लग्नकल्लोळ!

 झी मराठी वाहिनीवर तर डॉ. अजितकुमार देव यांचा विवाह पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरले आहेत.

|| निलेश अडसूळ

ठरावीक एका काळानंतर मालिकांमध्ये लग्नाचे ट्रॅक येत असतात. ‘लग्न’ ही बाब समान असली तरी प्रत्येक लग्नाची गोष्ट वेगळी. काही अपवाद वगळता दिमाखदार सोहळा, वराती, लोकांचा गराडा, उंची तामझाम असे काहीसे स्वरूप मालिकांमध्ये घडणाऱ्या लग्नांचे असते. मग मध्येच कुणीतरी मिठाचा खडा टाकणारे पात्र येते, कुणाचा तरी विरोध असतो किंवा नाना अडचणी येऊन उत्कंठा वाढत लग्न सफल होते. पण येत्या आठवड्यात झालेल्या आणि होणाऱ्या विवाहांची कथा काहीशी वेगळीच आहे. म्हणजे एकही लग्न सहज झालेले नाही. म्हणून कथाकल्लोळ करत झालेली ही लग्ने विशेष ठरतात. खास बात म्हणजे मुंबईबाहेर चित्रीकरण सुरू असल्याने त्या त्या जागेनुसार आशयात केलेले बदल, जुळवाजुळव यांची उत्तम सांगड घालून निर्माते-दिग्दर्शक आणि एकूणच चमूने हे विवाह यशस्वी केले आहेत. म्हणूनच या विवाहांचा शब्दचौघडा वाचकांच्या कानी पोहोचवण्याचा प्रयत्न…

सोनी मराठीवर वाहिनीवरील ‘तू सौभाग्यवती हो’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. वयात अंतर असलेल्या जोडप्यांची कथा वाहिनी जगतला नवीन नाही. पण ग्रामीण बाज, आर्थिक, सामाजिक स्तर भिन्न असलेली दोन कुटुंबे आणि दर्जेदार अभिनय साकारणारे कलावंत यामुळे ही मालिका वेगळी ठरते आहे. कणखर बाणा असलेल्या सूर्यभानरावांच्या घरी काम करणारी अल्लड ऐश्वार्या थेट आता सूर्यभान जाधव यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षक या दिवसाची वाट पाहत होते. या आधी ऐश्वार्याचे पहिले लग्न मोडले आहे. शिकार करत असताना सूर्यभान यांच्या हातून तिच्या नवऱ्याचा खून होतो. तर दुसरीकडे सूर्यभान विधुर आहेत, शिवाय त्यांचे प्रेमप्रकरणही आहे. असे असतानाही बायकोची जागा कुणालाही न देण्याचा सूर्यभान यांचा निश्चाय आहे. पण बायजींना मात्र ऐश्वार्याच्या साधेपणाची आणि वेळप्रसंगी हुशारीची, जिद्दीची जाणीव असल्याने त्यांना हीच सून म्हणून हवी आहे. म्हणून सूर्यभानही लग्नासाठी तयार होतात. इतका गुंता असताना लग्न करणे ही ऐश्वार्यासाठी तारेवरची कसरत असणार आहे. येत्या आठवड्यात ऐश्वार्याची मेंदी, हळद, सूनमुख पाहणे, अंगठी शोधणे असे नाना सोहळे प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

झी मराठी वाहिनीवर तर डॉ. अजितकुमार देव यांचा विवाह पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरले आहेत. आजवर अनेक मुलींची फसवणूक केलेला हा ‘देवमाणूस’ अखेर लग्नबेडीत अडकतो आहे. अर्थात यामुळे ‘देवमाणूस’ ही मालिका एका भलत्याच रंजक वळणावर आलेली आहे. एकीकडे पोलीस अधिकारी असलेल्या दिव्या सिंगसोबत प्रेम प्रकरण करून त्यांना गुह्य’ााचा तपास थांबवायला भाग पडणारा अजितकुमार देव, दिव्या सिंग भरीस न पडल्याने थेट डिम्पलशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. केवळ निर्णय नाही तर संपूर्ण गावापुढे याची घोषणा करतो. सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे डॉ. अजितकुमार देव हाच गुन्हेगार ‘देवी सिंग’ असल्याचा दिव्याचा संशय बळावतो आहे. त्याच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी तिने पछाडलेले जंग आणि लग्नाची लगबग असा दुहेरी आशय मालिकेत रंग भरतो आहे. आता हा विवाह सफल होणार की दिव्या सिंग त्याला बेड्या ठोकणार की पुन्हा डॉक्टर कुणाचा तरी खून करणार… प्रेक्षकांच्या मनाची उत्कंठा वाढवणाऱ्या अशा नाना प्रश्नांची उत्तरे येत्या भागात मिळतील.

तर याच वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतही लग्नाच्या आधीची म्हणजे प्रेमाची पूर्वतयारी सुरूआहे. नुकताच मोहित आणि स्वीटूचा साखरपुडा मोडल्याने त्यांच्या लग्नाचे सर्व आडाखे गळून पडले आहेत. साखरपुड्या दिवशी ओमने जरी आपल्या प्रेमाची कबुली दिली असली तरी स्वीटूने मात्र अद्याप कबूल केलेले नाही. या रगाड्यातून शांतता मिळावी म्हणून ओम परदेशी जाण्याचा निर्णय घेतो. पण त्या वेळी स्वीटू व्यक्त होते आणि तो माघारी फिरतो. आता नेमके त्यांच्या प्रेमाचे पुढे काय होणार? नलू आणि मालविका अशा दोन तटांवर सुरू असलेला हा संघर्ष थांबून स्वीटू खानविलकरांच्या घरची सून कधी आणि कशी होणार?, याची उत्सूकता प्रेक्षकांमध्ये आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत झालेला संजू आणि रणजीतचा विवाह सोहळा हादेखील एक रंजक प्रकार होता. रणजीतचे लग्न मोडणे, संजूचे वय लपवून तिच्याशी रणजीतचा विवाह होणे, त्याला आईसाहेबांचा विरोध असणे हा सगळा भाग आपण बघितलाच आहे. पण आता रणजीतच्या धाकट्या भावाचा म्हणजे सुजित ढालेपाटील याचा विवाह झाला आहे. अपर्णा या मुलीशी झालेला हा विवाह ही फसवणूक असल्याचे केवळ संजूच्या निदर्शनास आले आहे. परंतु तिच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. उलट अपर्णा आणि राजश्री वाहिनी यांच्या कारस्थानाला ती बळी पडते आहे. कटाच्या जोरावर झालेला हा लग्नसोहळा साधेपणाने पार पडला असला तरी येत्या काही भागात मालिकेत अपर्णा धुमशान घालणार आहे. सध्या राजश्रीची अपर्णाला साथ असली तरी भविष्यात अपर्णा राजश्री वाहिन्यांच्या डोक्यावरही मिऱ्या वाटू शकते. त्यामुळे आता लग्न झाले असले तरी आगामी भागात खरा गोंधळ ढालेपाटलांच्या वाड्यात होणार आहे.

अभिषेक आणि अनघा यांचा साखरपुडा होत असतानाच अचानक अभिला फोन येतो आणि तो निघून जातो. आत्महत्या करायला निघालेल्या अंकिताला वाचवण्यासाठी गेलेला अभिषेक येताना अंकिताशी लग्न करून येतो. असा अनपेक्षित विवाहसोहळा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत झाला आहे. अभिषेकची ही भूमिका प्रेक्षकांना अचंबा व्यक्त करायला लावणारी होती. पण अशा वेळी अरुंधती म्हणते तसे ‘देशमुखांच्या घराला दोन बायकांची परंपरा आहे’ हे वाक्य अभिलाही लागू होतेय का याचा प्रेक्षक विचार करत आहेत. कारण फसवणुकीने लग्नाच्या जाळ्यात ओढलेल्या अभिला सत्य समजल्यावर त्याची काय भूमिका असेल हे निर्णायक ठरणार आहे. विशेष म्हणजे अनघा सध्या मालिकेत दिसत नसली तरी प्रेक्षकांच्या मनात अजूनही अनघाचेच स्थान आहे. त्यामुळे अभि आणि अंकिताचे झालेले लग्न टिकेल का?, ही या लग्नाची खरी मेख आहे. अंकिताच्या स्वभावामुळे हे लग्न मोडले, तर अनघा झालेला अपमान विसरून पुन्हा देशमुखांच्या घरात येणार का?, अभि पुन्हा बोहल्यावर चढणार का?, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे मालिकांमध्ये केवळ लग्न नाही लग्नकल्लोळ सुरू आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 12:16 am

Web Title: wedding track in series sony tv channel series tu saubhagyavati ho akp 94
Next Stories
1 सोनी मराठीवर ‘गाथा नवनाथांची’
2 झी टॉकीजवर ‘केसरी’चा प्रीमिअर
3 ‘फ्रेंड्स’ची पुनर्भेट
Just Now!
X