एखाद्या घरात लग्नकार्य असलं की अनेकांचे रुसवे- फुगवे सहन करावे लागतात. हे फक्त तुमच्या आमच्या घरातल्या लग्नातच होते असे नाही. विराट कोहली आणि अनुष्का शर्मादेखील याला अपवाद ठरले नाही. विरुष्काने ११ डिसेंबरला इटलीत राजेशाही पद्धतीने लग्न केले. तीन दिवसांच्या या समारंभाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जवळच्या मित्र- परिवारांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पण चांगल्या कार्यक्रमात मिठाचा खडा पडावा त्याप्रमाणे या लग्नातही भांडणं झालीच.

पण ही भांडणं दोन कुटुंबात नसून डिझायनर आणि फोटोग्राफर यांच्यात झाली. विराट- अनुष्काचे डिझायनर सब्यसाची मुखर्जी आणि फोटोग्राफर जोसेफ राधिक यांच्यात सोशल मीडियावर बाचाबाची झाली. त्याचे झाले असे की, लग्नानंतर सब्यसाचीने तयार केलेले डिझाइन लोकांना दाखवण्यासाठी अनुष्का- विराटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पण हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना फोटोग्राफरला साधे क्रेडिटही सब्यसाचीला द्यावेसे वाटले नाही याचा जोसफला राग आला.

याचाच राग व्यक्त करताना जोसफने विराट- अनुष्काच्या साखरपुड्याचा फोटो शेअर करत म्हटले की, अनुष्काला तिच्या लग्नाचे प्रत्येक फोटो पोट्रेट फ्रेममध्ये हवे होते. तिच्या अनेक फोटोंपैकीच हा एक फोटो आहे. पण सब्यसाचीच्या टीमने त्यांचे काम दाखवण्यासाठी हा फोटो वापरला आणि मला क्रेडिटही देणे गरजेचे समजले नाही याचे मला दुःख आहे.

सोमवारी रात्री सब्यसाची मुखर्जीने विराट- अनुष्काच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले. या फोटोंमार्फत त्याने डिझाइन केलेल्या कपड्यांची माहिती सांगितली होती. पण यात तो जोसेफला क्रेडिट द्यायचेच विसरला. जोसेफ पुरस्कार विजेता वेडिंग फोटोग्राफर आहे.