टी. पी. अगरवाल – अध्यक्ष, इम्पा (इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन)

* निर्माता संघटना एकत्रित बैठक घेणार

महाराष्ट्रात दोन आठवड्यांसाठी पूर्णत: टाळेबंदीचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र या निर्णयाआधीच मुंबई आणि परिसरात सुरू झालेल्या अंशत: टाळेबंदीचा फटका इतर व्यवसायांप्रमाणेच चित्रपट व्यवसायालाही बसला आहे. आठवड्याच्या अखेरीस असलेली दोन दिवसांची टाळेबंदी, संध्याकाळची संचारबंदी तसेच चित्रीकरणासाठी नव्याने घालून दिलेले काही नियम या सगळ्याचा परिणाम मुंबई-महाराष्ट्रात सुरू असलेल्या मालिका, चित्रपट आणि वेबमालिकांच्या चित्रीकरणावर झाला आहे. सध्याच्या अडचणींविषयी सविस्तर सांगतानाच आत्ताची परिस्थिती लक्षात घेत चित्रीकरण करणे गरजेचे आहे का? यावर निर्माते एकत्रित येऊन विचार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

* अंशत: सुरू असलेल्या टाळेबंदीचा नेमका काय परिणाम व्यवसायावर झाला आहे?

गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या टाळेबंदीचा मोठा फटका चित्रपट व्यवसायाला बसला आहे. सप्टेंबरमध्ये चित्रीकरणांना सुरुवात झाली असली तरी अजूनही चित्रपटगृहे पूर्णपणे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शन अजूनही लांबणीवरच पडले आहे. त्यात अंशत: टाळेबंदीमुळे पुन्हा चित्रपटगृहे बंद झाल्याने व्यवसायाची गणिते अधिकच बिघडली आहेत. दुसरी गोष्ट राज्य सरकारने घातलेल्या नियमांनुसार अजूनही चित्रीकरणे सुरू आहेत, मात्र त्यात आता अनेक प्रकारच्या अडचणी भेडसावू लागल्या आहेत. चित्रीकरणाचे तास कमी झालेले नाहीत, अजूनही दहा तास सेटवर चित्रीकरण सुरू असते. सकाळी आठ ते संध्याकाळी साडेसहा अशा चित्रीकरणाच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत, जेणेकरून कलाकार रात्री आठपर्यंत घरी पोहोचू शकतील. रात्रीच्या वेळी स्टुडिओबाहेर चित्रीकरण करणे आता अशक्य झाले आहे. शिवाय, जास्तीतजास्त माणसे एकाच वेळी सेटवर असू नयेत हे बंधन असल्याने जी गर्दीची दृश्ये आहेत तीही चित्रित होऊ शकत नाहीत. कमीतकमी तंत्रज्ञ आणि कामगारांमध्ये ठरलेल्या वेळेत चित्रीकरण पूर्ण करणे आता निर्मात्यांसाठीही कठीण होत चालले आहे.

 

* फक्त सेटवरच्या अडचणी वाढल्या आहेत की चित्रपटाच्या एकूण प्रक्रियेतही काही बदल करावे लागणार आहेत?

फक्त सेटवरच्या अडचणी वाढलेल्या नाहीत, तर याचा परिणाम लेखन प्रक्रि येपासून चित्रीकरणापर्यंत सगळ्यावरच होतो आहे. मुळात गर्दीची दृश्ये चित्रित करता येणार नाहीत हा मुद्दा आहे, त्यामुळे लेखकांना कथेत बदल करणे ओघाने आलेच. एकाच दृश्यात जास्त माणसे असणार नाहीत. आता ही काळजी पहिल्यांदा लेखनात घ्यावी लागणार आहे.आमची संघटना ही चित्रपट, वेबमालिका सगळ्याच बाबतीत काम करते आणि या दोन्हींसाठी चित्रीकरण करताना कमीतकमी माणसांमध्ये चित्रीकरण करणे शक्य नसते. त्यामुळेच चित्रीकरण पुढे ढकलण्याचाही निर्णय निर्मात्यांना घ्यावा लागेल. टाळेबंदी जाहीर झालीच तर चित्रीकरण पूर्णपणे ठप्प होईल.

 

* अनेक मोठ्या कलाकारांना करोनाची लागण होत आहे, त्यामुळे चित्रीकरण बंद पडत आहे, तर सेटवर आरोग्याच्या दृष्टीने कशी काळजी घेतली जाते?

गेल्या काही दिवसांत रणबीर कपूर, आलिया भट्ट, अक्षयकुमार, कार्तिक आर्यन यांसारख्या अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याने चित्रीकरण काही दिवस बंद ठेवावे लागले आहे हे खरे आहे. पण आम्हाला फक्त  कलाकारांचा विचार करून भागत नाही, तर कामगार आणि तंत्रज्ञांचा विचार प्राधान्याने करावा लागतो. राज्य सरकारने चित्रीकरणासाठी जी मार्गदर्शक नियमावली घालून दिली आहे, ती सेटवर काटेकोरपणे पाळली जात आहे. याशिवाय, संघटना म्हणून आम्ही प्रत्येक निर्मिती संस्थेबरोबर बोलून दर आठवड्याला त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतो. कुठे काही शंकास्पद आढळल्यास त्यानुसार चौकशी आणि कार्यवाही केली जात आहे.

 

* कामगार-तंत्रज्ञांच्या आरोग्याचा प्रश्न कसा हाताळला जातो?

आपापल्या सेटवर असलेल्या कलाकार आणि कामगार दोन्हींची काळजी निर्मात्यांना घ्यावीच लागते. सेटवर डॉक्टर उपलब्ध असणे, सेटवर येणाऱ्या कामगारांची नियमित तपासणी, एखाद्याला सेटवर लागण झाली तर इतरांची करोना चाचणी करणे, त्यांचे अहवाल मागवणे, त्यांना विमा संरक्षण या बाबी रोजच्या रोज पाहिल्या जातात. निर्माता आणि कामगार संघटना एकत्रितरीत्या काम करत आहेत, मात्र कामगारांचा प्रश्न खूप मोठा आहे. कलाकार आपापल्या गाडीने सेटवर येतात, काळजी घेतात. कामगारांचे तसे होत नाही, चित्रीकरण संपल्यानंतर ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने आपापल्या निवासाच्या ठिकाणी जातात, ते कुठल्या परिसरात राहतात, याची कल्पना नसते. शिवाय, सेटवर एकाला लागण झाली आणि ते लक्षात आले नाही तर लागोपाठ १८ किंवा २५ एवढ्या मोठ्या संख्येने लागण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा विचार आम्ही जास्त करतो आहोत.

 

*  ‘भूलभुलय्या २’, ‘राम सेतू’ अशा मोठ्या चित्रपटांसह काही वेबमालिकांचेही चित्रीकरण थांबविण्यात आले आहे. निर्मात्यांच्या आर्थिक गणितांवर याचे काय परिणाम होतील?

आपल्याकडे निर्मात्यांचा विचार कोणीच करत नाही. एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी ही निर्मात्यावर असते. त्यामुळे सेटवर कोणीही आजारी पडले किं वा एखाद्याला करोनाची लागण झाली तर त्या अनुषंगाने येणारा खर्च करणे, काळजी घेणे ही निर्माता किंवा संबंधित निर्मिती संस्थेची जबाबदारी असते. पण निर्माताच आजारी पडला तर काय… त्याची जबाबदारी कोणावर? गेल्या काही दिवसांत ज्या वेगाने सेटवर कलाकारांना आणि कामगारांना करोनाची लागण होत आहे ते पाहता निर्मात्यांना चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यावाचून पर्यायच उरलेला नाही. पूर्ण टाळेबंदी झाली तर आम्हाला तो विचार करावा लागणार नाही, मात्र सध्या दूरचित्रवाणीवरील मालिका- वेबमालिका यांची चित्रीकरणे सुरू आहेत. नियमांचे काटेकोर पालन करूनही करोनाची लागण होते, अशा वेळी सेटवर मोठ्या संख्येने लोक आजारी पडण्याची शक्यता आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या परिस्थितीत खरोखरच चित्रपट- वेबमालिका- मालिका यांचे चित्रीकरण करणे गरजेचे आहे का? असा विचार आम्ही करीत आहोत.

मुलाखत : रेश्मा राईकवार