रेश्मा राईकवार

वेलकम होम

वरवर सोप्या वाटणाऱ्या गोष्टी, सोपे वाटणारे प्रश्न प्रत्यक्ष अनुभवाला येतात तेव्हा त्यातली गुंतागुंत खऱ्या अर्थाने आकळत जाते. माणूस सोयीने म्हणा किंवा सवयीने पुढे जात राहतो मात्र असे अनेक अनुभव जे सांगण्याजोगे असतात, पण मांडता येत नाहीत ते त्या अनुभवाच्या शिदोरीतच जमा होऊन राहतात. कित्येक वर्षे पिढय़ान्पिढय़ा हरएक स्त्रीच्या मनात उमटलेला असाच प्रश्न जो उत्तराविना त्याच अनुभव किंवा आठवणींच्या पोतडीत जमा झाला होता, त्याला पडद्यावर अत्यंत साध्या-सहज आणि तितक्याच नितळ भावनेतून दिग्दर्शक द्वयी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी मोकळे केले आहे. ‘वेलकम होम’ हा खऱ्या अर्थाने प्रत्येक स्त्रीच्या मनातला हुंकार आहे..

स्त्रीचे खरे घर कोणते? तिचा जन्म झाला ते घर की लग्नानंतर ती ज्या घरात जाते ते घर? आणि काही कारणाने तिच्या वैवाहिक नात्यांत अंतर आलेच तर इतकी वर्षे सांभाळलेले, जिवापाड जपलेले तिचे घर तिचे राहत नाही. ते सगळे सोडून जरी ती माहेरी परतली तरी ते घर तरी तिचे असते का? तिचे उरते का? आत्ताच्या काळात खरे म्हणजे कमावत्या स्त्रियाही स्वत:चे घर खरेदी करतात त्यामुळे त्यात काय?, असाही विचार होऊ शकतो. मात्र दोन घरांमध्ये वावरत असूनही तिला आपले वाटावे असे घर असण्याची गरज भासतेच.. कुठल्याही स्त्रिला कधी ना कधी तरी माझे घर हा विचार चाटून जातोच. नेमकी इथेच कुठे तरी मेख आहे, समजण्यात आणि समजून घेण्यात.. ‘वेलकम होम’ या चित्रपटाची सुरुवात या प्रश्नापासून होते. आणि मग चित्रपटाची नायिका सौदामिनी (मृणाल कुलकर्णी), सौदामिनीची आई विमल (उत्तरा बावकर), तिची बहीण मधुमती (स्पृहा जोशी), ताई मावशी (दीपा लागू), सासू (सेवा चौहान) ते अगदी आत्ताच्या पिढीपर्यंत म्हणजे तिची मुलगी कुकी (प्रांजली श्रीकांत) या प्रत्येकीच्या जगण्यातून, त्यांच्या कथेतून वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रश्न समोर येतो.

अगदी या स्त्रियाच असे नाही, कारण घर किंवा त्या अर्थाने आपली ओळख, अस्तित्व ही गोष्ट पुरुषांसाठीही तितकीच महत्त्वाची असते. इथे सौदामिनीचे वडील अप्पा (मोहन आगाशे) आपल्या परीने या प्रश्नाचे उत्तर शोधतात. त्यांच्यासाठीही त्यांची आई (अश्विनी गिरी) या शोधामागचे किंवा अनुभवाचे कारण असते. एका क्षणी आहे त्या पद्धतीने नाते पुढे न्यायचे नाही, याची पर्यायाने स्वत:ची ठाम जाणीव झालेली सौदामिनी आपली मुलगी आणि सासू यांना घेऊन माहेरी येते. अशा वेळी पुढे काय करणार आहेस?, हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटणारा प्रश्न असतो. पण, त्या वेळी मुळात इतकी वर्षे जे घडले आहे आणि एका क्षणात संपले आहे, त्याची मनातली आवराआवरच झालेली नसते. तो पसारा नेमका कुठला होता, काय निसटले आहे आणि काय मागे ठेवायचे आहे, याची बांधाबांध हीच अवघड गोष्ट असते. सौदामिनीच्या मनातली ही गुंतागुंत आणि त्या ताणाबरोबरचा तिचा इथून पुढे तिची जागा कोणती, तिचे अस्तित्व कोणते पर्यायाने तिचे घर कोणते हा शोध खूप साध्या प्रवाही पद्धतीने दिग्दर्शकांनी मांडला आहे. त्यामुळे पडद्यावरची गोष्टच वेगळी ही भावनाच तिथे रहात नाही, तुझ्या-माझ्या घरातील गोष्ट अनुभवावी इतक्या आपलेपणाने हा विषय ‘वेलकम होम’ चित्रपटातून समोर येतो.

दिग्दर्शक म्हणून सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर ही दोन नावेच खरे म्हणजे चित्रपट पाहण्यासाठी पुरेशी आहेत. मात्र इथे आवर्जून सांगावी अशी गोष्ट म्हणजे एरव्ही त्यांच्या चित्रपटांची वास्तव शैली आपल्याला ओळखीची आहे. ‘वेलकम होम’ या चित्रपटातही ती वास्तव शैली त्यांनी सोडली नसली तरी हा नेहमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा प्रयोग म्हणता येईल. साधे-सोपे, कुठलाही गर्भितार्थ दडलेला असल्याचा भाव न घेता आलेले उत्कृष्ट संवाद, मेलोड्रामाला तीळभरही नसलेली जागा, तितकीच सुंदर आणि संगीताचा भडिमार न करता आलेली श्रवणीय गाणी असा वेगळाच सूर या चित्रपटाला लागला आहे. चित्रपटातील चारही गीते सुनील सुकथनकर यांनी लिहिली असून पार्थ उमराणी याने संगीतबद्ध केली आहेत. अमृता सुभाषच्या आवाजातील ‘किर्र रान..’ हे गाणे, रॅप गाणे किंवा ‘राधे राधे’ ही तिन्ही गाणी वेगळी आहेत.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. मनातले वादळ आणि बाहेरची शांतता यात घुसमटलेली, त्यातून बाहेर पडायचे कसे याची कल्पना असलेली आणि त्यातून आपल्या पद्धतीने पुढे येणारी आजची नायिका मृणाल कुलकर्णी यांनी अप्रतिम वठवली आहे. सुमीत राघवन याच्या व्यक्तिमत्त्वातच एक प्रसन्नता आहे, संवादातून बोलण्यापेक्षा नजरेतून होणारा संवाद, देहबोलीचा अचूक वापर या सगळ्यातून ती व्यक्तिरेखा हवीहवीशी वाटत राहते. सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी या दोघांमधली ही अभिनयाची नाजूक जुगलबंदी ही पर्वणी आहे. अभिनयातील हीच सहजता आणि प्रगल्भता मोहन आगाशे, उत्तरा बावकर यांच्या अभिनयातून अनुभवायला मिळते. सेवा चौहान, अश्विनी गिरी, स्पृहा जोशी प्रत्येकाने आपल्या भूमिका चोख केल्या आहेत. चित्रपटात अगदी छोटय़ा भूमिकेतही सारंग साठय़े, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ मेनन, दीपा लागू, सुबोध भावे असे चांगले कलाकार आहेत. त्यामुळे एक उत्तम कथा, उत्तम संवाद असलेला हा चित्रपट या कलाकारांनी आपल्या सहज अभिनयाने जिवंत केला आहे.

कथा-पटकथा हा या चित्रपटाचा आत्मा आहे. पटकथेतच आपल्याला काय सांगायचे आहे याची स्पष्टता असल्याने माझे घर कोणते या प्रश्नापासून ते जिथे आहोत तिथे त्या क्षणी आनंद शोधणाऱ्या, वाटणाऱ्या माणसांपर्यंत आपण पोहोचतो. कुठल्याही घरात असा प्रसंग घडलाच तर आई-वडील, आई-मुलगी, वडील-मुलगी यांच्यात जे संवाद होतील त्या संवादातून आपला विचार प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या या चित्रपटात अनेक दृश्ये लक्षात राहतील अशी आहेत. विशेषत: संवाद-अभिनय यांच्या अफलातून मिश्रणामुळे ही अधिक धारदार झाली आहेत. इथे नायिकेच्या तोंडी एक संवाद आहे, ‘जबाबदारीचे काय? ती ज्याला घ्यावीशी वाटते, त्याची होऊन जाते.’ प्रेक्षकांना उत्तम कलाकृती द्यायला हवी, या जबाबदारीच्या भावनेतून येणारे चित्रपट विरळा.. यातच सारे आले.

* दिग्दर्शक – सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर

* कलाकार – मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, मोहन आगाशे, उत्तरा बावकर, स्पृहा जोशी, अश्विनी गिरी, प्रसाद ओक, सिद्धार्थ मेनन, दीपा लागू, सुबोध भावे, सारंग साठय़े, प्रांजली श्रीकांत, सेवा चौहान.