सध्या चरित्रपट आणि महनीय व्यक्तींचे विचार आणि कार्य चित्रपटाद्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला जातोय. ‘व्हॉट अबाऊट सावरकर’ या चित्रपटातून स्वा. सावरकर यांचे विचार दाखविणे अपेक्षित होते. परंतु rv14स्वा. सावरकर यांच्याविषयी अनुदार उद्गार काढून वाद ओढवून घेणाऱ्या एका राजकीय नेत्याच्या खेळीला उत्तर देण्याचा प्रयत्न करीत केवळ एकाच घटनेभोवती चित्रपटाची गुंफण करण्यात आली आहे. हे दाखवायला हरकत काहीच नाही. परंतु त्यासाठी कथानकाची, प्रसंगांची मांडणी करताना दिग्दर्शकद्वय गडबडले आहेत असे दिसते. स्वा. सावरकर यांच्या विचारांशी साधम्र्य राखणारे, त्यांच्या विचारांचे पाईक तसेच विरोधक, आमचे नेतेच श्रेष्ठ म्हणणारे अन्य महनीय व्यक्तींचे समाज, सावरकरभक्त-सावरकर विरोधी अशा सर्वच स्तरांतील लोकांवर टीका करण्याचे काम मात्र दिग्दर्शकद्वयीने केले आहे. नाटय़पूर्णतेचा अभाव, प्रेक्षकाला खिळवून न ठेवणारी मांडणी यामुळे चित्रपट रंजक ठरत नाही.
स्वा. सावरकर यांची देशभक्ती, त्यांनी अंदमानच्या कोठडीत भोगलेला तुरुंगवास, सोसलेल्या हालअपेष्टा याविषयी सर्वानाच आदर आहे. किंबहुना स्वातंत्र्यलढय़ात आपापल्या परीने सहभागी झालेले आणि मोठे योगदान देणाऱ्या सर्वच महनीय व्यक्तींबद्दल नितांत आदर बाळगायलाच हवा. परंतु आपल्या चित्रपटाचा नायक थोडा अतिच सावरकरभक्त आहे. अय्यंगार हे पेट्रोलियममंत्री स्वा. सावरकर यांच्याबाबत अनादर करणारे वक्तव्य करतात आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून आपला नायक सुरुवातीला ब्लॉग फेसबुकवर लिहून हजारो ‘लाइक्स’ मिळवितो. इथपासून ते मंत्री अय्यंगार यांच्या मुंबई भेटीदरम्यान त्यांना चपलांचा हार घालण्याची योजना तो तयार करतो. परंतु लोकांच्या प्रचंड रोषामुळे ऐनवेळी मंत्र्यांचा मुंबई दौरा रद्द होतो. मग दिल्लीपर्यंत नायक जातो आणि योजना फत्ते करतो. rv05चित्रपटाचा नायक नवोदित अभिनेता श्रीकांत भिडे, त्याच्या नायिकेच्या भूमिकेतील सारा श्रवण आणि त्यांना या योजनेत मदत करणाऱ्या त्यांच्या मित्रांच्या भूमिकेतील अविनाश नारकर, अतुल तोडणकर यांनी दिग्दर्शकाबरहुकूम भूमिका साकारल्या आहेत. परंतु लेखक-दिग्दर्शकांनी चित्रपटातून स्वा. सावरकर यांचे विचार मात्र फारसे दाखविलेले नाहीत. केवळ स्वा. सावरकर यांच्याबद्दल आदर न बाळगणाऱ्यांना धडा शिकविण्यावर कथानकात भर दिला आहे. त्यामुळे चित्रपटाचा जीव लहान आहे. कथानकाची मांडणी, संवाद, छायालेखन हे सर्व सपक पद्धतीने प्रेक्षकांसमोर येते. त्यामुळे चित्रपट भिडत नाही.
शरद पोंक्षे यांच्यासारखे कलावंत चित्रपटात भूमिका करीत असूनही त्यांच्या भूमिकेला फारसा वाव दिग्दर्शकद्वयीने देऊ नये ही दुर्दैवाचीच बाब म्हटली पाहिजे. ‘जयोस्तुते’ हे गाणे मात्र श्रवणीय संगीताने नटलेले आहे.

व्हॉट अबाऊट सावरकर ?
निर्माते – अतुल परब, रोहित शेट्टी
दिग्दर्शक – रूपेश कटारे, नीतीन गावडे
संगीतकार – अभिषेक शिंदे, अवधूत गुप्ते
छायालेखक – ए. के. एन. सॅबेस्टीयन
कलावंत – शरद पोंक्षे, अविनाश नारकर, विवेक लागू, अतुल तोडणकर, नवोदित श्रीकांत भिडे, सारा श्रवण व अन्य.