|| पंकज भोसले

टॉमी विर्कोला या नॉर्वेमधील दिग्दर्शकाचे नाव जगभरातील सिनेवेडय़ांसाठी एकाएकी लक्षवेधी ठरले ते त्याने केलेल्या ‘किल बुलीजो’ या आफाट विडंबनपटामुळे. हा सिनेमा अर्थातच क्वेन्टीन टेरेन्टीनोच्या ‘किल बिल’चा नॉर्वेजिअन अवतार होता. पण त्यातील विनोदाचा बाज आणि भौगोलिक पाश्र्वभूमीमुळे विडंबन असूनही त्याला स्वतंत्र ओळख मिळाली. आपले टोकाचे सिनेमावरचे प्रेम या दिग्दर्शकाने ‘डेड स्नो’मध्ये ओतले आणि पडद्यावर नाझी झॉम्बींची जाणती आणि धावती फौज तयार झाली.

अमेरिकी सिनेमांवर सर्वार्थाने पोसलेल्या या दिग्दर्शकाने हॉलीवूडच्या तोडीचा चित्रपट नॉर्वेतल्या बर्फाळ प्रदेशात बनवून दाखविला. परिणामी पुढे अमेरिकी आवतणावर त्याचा पहिला इंग्रजी सिनेमा ‘हान्सल अ‍ॅण्ड ग्रेटल’ अवतरला. परीकथेला काळ्या विनोदाची फोडणी देत चेटकिणींच्या शिकारींच्या या देमारपटाने टॉमी विर्कोलाला तिकीटबारीवर प्रचंड यशस्वी ठरवला आणि विचित्र आणि पठडीबाहेरच्या संकल्पनांनी चित्रपट तयार करणारा दिग्दर्शक म्हणून त्याची ख्याती झाली. डेड स्नोच्या दुसऱ्या भागानंतर मधल्या तीन-चार वर्षांत तो कोणता चित्रप्रकार आपल्या तिरकस शैलीत घेऊन येतोय याची वाट पाहणाऱ्यांना ‘व्हॉट हॅपण्ड टू मण्डे’ या नव्या चित्रपटाची मेजवानी मिळाली आहे.

‘व्हॉट हॅपण्ड टू मण्डे’ ही वैज्ञानिका आहे. पुढच्या ५० वर्षांनंतरचे संभाव्य जग त्यात चितारण्यात आले आहे. हे जग अर्थातच कोणत्याही अर्थाने सुखावह नाही. पर्यावरणाच्या हानीमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे ते तंत्रप्रगत असूनही जगण्यासाठी नंदनवन नाही. खाणाऱ्या तोंडांची गरज भागविण्याऐवजी तोंडांची संख्याच कमी करण्याचा उपाय सरकार राबविते. लोकसंख्या नियंत्रणासाठी एक अपत्य योजना आखण्यात येते. त्याद्वारे अतिरिक्त अपत्याला सरकार कुटुंबाकडून ताब्यात घेऊन गोठवून ठेवते. जोवर मानवी राहण्यायोग्य पर्यायी ग्रह मिळत नाही, तोवर हाच प्रकार वर्षोनुवर्षे राबविला जातो आणि लोकसंख्येवर कठोरपणे ताबा ठेवला जातो. विर्कोलाची नवलकथा या वातावरणातच तयार होते. एका बाईचा जुळ्या-तिळ्या नाही  तर एका वेळी चक्क सात मुलींना जन्म देऊन मृत्यू होतो. त्या मुलींचा आजोबा टेरेन्स सेटमन (डॅनिअल डेफो) या सातही मुलींचा जन्म सरकारी यंत्रणेपासून लपवून ठेवतो. त्या सातही मुलींना कॅरन ही एकच ओळख घेऊन घरातच बंदिवास पत्करावा लागतो. त्यांना चेहरा, नाक-डोळे आणि शरीरकाठी-वजनात असलेले नैसर्गिक साम्य राखण्यासाठी कसरत करावी लागते. आठवडय़ातील प्रत्येक वाराच्या नावाने त्यांचे घरात नामकरण होते. अन् त्या दिवशी त्यांना कॅरन सेटमन ही एकच ओळख ठेवून घराबाहेर पडावे लागते. म्हणजे शाळेत आठवडय़ाच्या प्रत्येक दिवशी वेगळी मुलगी जात असूनही त्या जगाच्या दृष्टीने एकच व्यक्ती असतात. एका मुलीचे बोट अपघातात तुटल्यामुळे इतर सहाही जणांना आपले बोट तसेच तोडून घ्यावे लागते. सरकारी यंत्रणा एक अपत्याबाबत इतके आग्रही असतात की गल्लोगल्ली त्यासाठी सुरक्षा यंत्रणा काम करीत असतात.  त्यामुळे या मुलींना पराकोटीचे संरक्षणकडे आपल्याभोवती उभारावे लागते.

चित्रपटातील सप्ताळ्यांच्या भूमिकेत नूमी रपास या अभिनेत्रीने चमत्कार घडविला आहे. सातही बहिणी दिसण्यात तंतोतंत सारख्या असल्या तरी त्यांची प्रत्येकाची स्वभाववैशिष्टय़े वेगळी आहेत. त्यात कुणी अट्टल पुरुषी आहे तर कुणी कट्टर स्त्रीवादी. एक स्वातंत्र्यप्रेमी तर दुसरी भित्री. एक पुस्तकवेडी आहे अन् एक फॅशनवेडी. या साऱ्या सात जणी बाहेर एकटय़ाने सारखीच जीवनशैली आचरणात आणत असल्या तरी घरामध्ये एकत्र वावरताना आपल्या वैशिष्टय़ांमुळे भिन्न जाणवायला लागतात. सरकारला गंडवत तीसेक वर्षांचे आयुष्य जगलेल्या या सप्ताळ्यांच्या आयुष्यात एकदा अवघड प्रसंग निर्माण होतो. घरातून कार्यालयात निघालेली ‘मण्डे’ रात्रीचे बारा वाजले तरी परत येत नाही. मग दुसऱ्या दिवशी तिचे काय झाले याच्या शोधार्थ दुसऱ्या बहिणीला कार्यालय गाठावे लागते. पण एकाच वेळी दोन कॅरनचे बाहेर असणे त्यांच्या आजवर जपलेल्या रहस्याला फोडणारे बनते आणि या सप्ताळ्यांचे जीवनयुद्ध आणखी तीव्र होते.

विर्कोला याचा हा चित्रपट भविष्यातील परीकथेसारखा आहे. दर दिवशी एकाच मुलीला बाहेर जावे लागण्याची आणि पुढला सर्व आठवडा तिला दुसऱ्यांच्या नजरेतून जग अनुभवण्याची कल्पना एकाच वेळी गमतीची आणि विचित्रही आहे. विर्कोलाने पन्नास वर्षांनंतरची लोकसंख्याभाराने फुगलेली पृथ्वी उभारली आहे. इथले आकाश  निरभ्र नाही आणि तंत्रज्ञान मात्र खूपच पुढे गेलेले आहे. संगणक, टीव्ही आणि गॅझेट्सचे अत्याधुनिक आणि कल्पित रूप इथे दिसते. इथे धावणाऱ्या गाडय़ांची चाकेही विलक्षण आहेत. मांसबाजारात लटकविलेल्या उंदरांवरून खाद्यटंचाईची परिस्थिती स्पष्ट होते.

विर्कोलाच्या आधीच्या चित्रपटांमधील अतिशयोक्ती अलंकारित विनोद इथे सापडणार नाही. पण इथली हाणामारी आणि कुरघोडय़ांचे प्रकार हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातील देमार चित्रपटांच्या तोडीचे आहेत. वेगवान हाणामाऱ्या करीत यातील बहिणींची फौज सरकारविरोधात सक्रिय होते. पर्यावरणाचे भविष्यदर्शन, प्रेम, असूया यांच्या जोडीला कुतूहलयुक्त मनोरंजनाचा भरपूर मारा या चित्रपटात करण्यात आला आहे. पुढील दशकभरामध्ये अशाच शैलीत नवलकथांचा आविष्कार करीत राहिला, तर हॉलीवूडच्या म्हणून नावाजल्या जाणाऱ्या कल्पक अ‍ॅक्शनपट चित्रकर्त्यांना विर्कोला सहज मागे टाकू शकेल, यात शंका नाही.