मला त्या लोकांची गोष्ट माहीत आहे ज्यांनी तुला कायम हिणवलं. तेही इतकं की तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकला असता, अशी भावनिक पोस्ट दिग्दर्शक शेखर कपूर यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर ट्विटरवर लिहिली. रविवारी (१४ जून) सुशांतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून नैराश्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊलं उचललं असावं असं म्हटलं जात आहे.

शेखर कपूर यांनी ट्विट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘तू ज्या वेदनेतून जात होतास त्याची मला कल्पना होती. मला त्या लोकांची गोष्ट माहीत आहे ज्यांनी तुला कायम हिणवलं. तेही इतकं की तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकला असता. गेल्या सहा महिन्यांत मला तुझ्याजवळ असायला हवं होतं. कदाचित तू माझ्याकडे आला असता तर आज गोष्ट वेगळी असती. तुझ्यासोबत जे घडलं हे त्या लोकांचं कर्म आहे. तुझं नाही’, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं.

आणखी वाचा : सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं कारण स्पष्ट  

अवघ्या ३४ व्या वर्षी सुशांतने जगाचा निरोप घेतला. त्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.