|| निलेश अडसूळ

‘संकल्प’ या शब्दाचे महत्त्व आणि कार्य दोन्हीही विलयाला गेले आहे, कारण संकल्पच काय तर कोणतीही बाब जबाबदारीने निभावण्याची क्षमताच नाहीशी झालेली दिसते. त्यात नवीन वर्षांनिमित्त केलेला संकल्प म्हणजे थट्टाच. असे असले तरी आजमितीला वैयक्तिक जीवनासहित प्रत्येक क्षेत्रात संकल्प करायची गरज आहे. करोनाने केलेली उलथापालथ, आर्थिक अवनती, कामाची बदललेली पद्धत, यंत्रणा, तंत्रज्ञान अगदी माणसांच्या स्वभावात झालेले बदलही विचार करायला भाग पडणारे आहेत. त्यामुळे या काळरात्रीतून प्रकाशाकडे मार्गस्थ होताना केवळ मोघम बाण मारून चालणार नाही. तर साचेबद्ध आणि संकल्पनात्मक आडाखे बांधून भविष्याची वाटचाल करणे आवश्यक आहे. एकूण परिस्थितीचा अंदाज घेतला तर त्यांच्या जगण्याला किंवा कार्यक्षेत्राला अधिक धक्का लागला आहे, ती मंडळी आजही पूर्णत: सावरलेली नाहीत. शिथिलीकरणाला बराच काळ लोटला असला तरी वीट वीट रचून पुन्हा सावरते आहे, ते म्हणजे आपले मनोरंजन क्षेत्र. झालेली पडझड मोठी असल्याने वेळ लागणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे नव्या वर्षांकडे वाटचाल करताना नाटक, चित्रपट आणि मालिका क्षेत्राचा नेमका काय दृष्टिकोन आहे, नियोजन, आयोजन, व्यवस्थापन यात झालेले किंवा अपेक्षित बदल कोणते यावर दृष्टिक्षेप टाकण्याचा हा प्रयत्न आहे. प्रातिनिधिक स्वरूपात त्या त्या क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी मांडलेला हा उद्याचा ‘मनोरंजनविचार’.

नाटक – ‘आपण प्रेक्षकांकडे जाऊ’

आलेले संकट इतके अचानकपणे होते की क्षणात सगळे स्तब्ध झाले. हे इतके नवीन होते की याची तीव्रता, परिणाम कशाविषयीही आपण आडाखे बांधू शकत नव्हतो. तेव्हा नाटकाच्या संस्कारातला एक महत्त्वाचा घटक अंगीकारणे मला योग्य वाटले, तो म्हणजे ‘पॉज’. कारण परिस्थितीला दोष देण्यापेक्षा किं वा तर्क करत बसण्यापेक्षा थांबून त्याला समजून घेणे कधीही उत्तम. पण पुढे असा काळ आला सर्व गोष्टींचा विचार करून थांबण्याची सीमा ओलांडली जाऊ लागली, तेव्हा कृतीशिवाय कोणताच पर्याय नव्हता. अर्थात, आता पूर्वीसारखे वातावरण नसेल पण मार्ग काढायला हवा. तो मार्ग म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे. जे सद्य:स्थितीत तंत्रज्ञानाने सहज शक्य होऊ शकते. हृषीकेश जोशीने मांडलेली ‘नेटक’ची संकल्पना स्तुत्य आहे. ओटीटी हा पर्याय हा समोर दिसत असला तरी तो अखेरचा का? हेही पाहणे गरजेचे आहे. बदलत्या काळात लोक आपल्यापर्यंत येण्यापेक्षा आपण लोकांपर्यंत कसे पोहोचू यासाठी कृती करायला हवी. कदाचित कालांतराने ओटीटीसाठीही नाटक लिहिले जाईल. याची सकारात्मक बाजू म्हणजे जो प्रेक्षक नाटकाला येऊ शकत नाही तो नाटक पाहील, आपला प्रेक्षक होईल. मुंबईत राहूनही केवळ प्रवासामुळे नाटकाला येऊ शकत नाही अशांची संख्या मोठी आहे. प्रेक्षक किती येतील, प्रतिसाद कसा आणि किती काळ असेल, हेही पुढचे आव्हान आहे. ‘व्यवसाय आणि जागा’ या नव्या समीकरणावर काम करायला हवे. नाटक आता त्याच त्या ठरलेल्या नाटय़गृहातून बाहेर पडायला हवे. यानिमित्ताने आपण लोकवस्तीत पोहोचू. प्रेक्षकांची ‘नाटक लाइव्ह बघण्याची मानसिकता घडवणे’ ही कलाकार म्हणून आपली जबाबदारी आहे. सुनील बर्वे, रंगा गोडबोले, अतुल पेठे या मंडळींनी करोनाकाळात केलेले प्रयोग आदर्शवत आहेत. प्रेक्षकांची अडचण लक्षात घेऊन हजार माणसांच्या क्षमतेचे नाटय़गृह गरजचे आहे का? की त्यापेक्षा दोनशेचे दहा चालतील. अर्थात हे लगेच होणारे नाही. पूर्वी छबिलदास, बालमोहन, भुलाभाई, एल्फिन्स्टन, किंग्ज जॉर्ज अशा ठिकाणी प्रयोग होतच होते. विजया मेहता, अमोल पालेकर अशा दिग्गजांनी तिथे प्रयोग केले आहेत. अशा छोटय़ा नाटय़गृहातूनच प्रेक्षक तयार होईल. परिणामी अर्थकारणही बदलेल. जे बदलणे गरजेचे आहे. – विजय केंकरे, नाटय़दिग्दर्शक

मालिका – ‘पुढचा काळ प्रचंड मेहनतीचा’

करोनाकाळात सर्वजण घरी असल्याने प्रेक्षक वाढला, परिणामी आमची जबाबदारी वाढली. मालिका ही सशक्त करमणूक देणारी व्यवस्था आहे. नाटक आणि चित्रपटासाठी लोकांना बाहेर पडणे शक्य नव्हते त्यामुळे लोक वाहिन्या आणि ओटीटीकडे वळले. आता प्रेक्षक वाढल्याने आपणही आशयाबाबत परिपूर्ण असणे गरजेचे आहे. त्यामुळे करोना काळात वाहिनीकडे आलेला प्रेक्षक टिकवणे आणि वाढवणे हे आमचे आव्हान आहे, त्याच दृष्टिकोनातून वाहिन्यांची वाटचाल सुरू आहे. कारण हळूहळू जसे सुरळीत होत जाईल तेव्हा हा प्रेक्षकवर्ग वाहिनीसोबत असायला हवा. तेव्हाही त्यांचा रस कमी होता कामा नये. त्यासाठी सातत्याने नवीन विषय, वेगळ्या कथा देणे आमचे काम आहे. नाटक आणि सिनेमा ओटीटीवर आले, त्यांनी माध्यम बदलले, पण वाहिन्या मात्र वाहिन्यांच्याच जागी आहेत. किंबहुना ओटीटी ही त्याला मिळालेली जोड आहे. जास्तीत जास्त लोक घरी राहू लागल्याने लोकांचा टीव्ही बघण्याचा वेळ वाढला आणि प्राइम टाइमही वाढला. हा वाढलेला वेळच वाहिन्यांना मिळालेली देणगी आहे. आता वाढलेला वेळ सार्थकी लावायला हवा. अर्थात सिनेमा आणि ओटीटी हे आता स्पर्धक झाले आहेत त्यामुळे स्पर्धा अधिकच चुरशीची आहे. म्हणूनच पुढचा काळ अधिक मेहनतीचा असणार आहे. या काळात चित्रीकरणावरही परिणाम झाला. अजूनही ३३ टक्के उपस्थितीत चित्रीकरण सुरू आहे, ११ नंतर संचारबंदी आहेच. त्यामुळे रात्रीच्या चित्रीकरणाची वेळ कमी झाली. मनुष्यबळ घटल्याने श्रम वाढले. एवढे बदल होऊनही रोज मालिका चित्रित होत आहेत. म्हणजे येईल त्या परिस्थितीला तोंड देणे हेच आमच्या हातात आहे. शिवाय वेगळा आशय देण्याची धडपड सुरूच आहे. कौटुंबिक विषयांसोबतच प्रेमकथा, हास्यविनोद, रहस्यकथा, चरित्रमालिका असा नानाविध आशय देत आहोत आणि राहू. हेच वेगळे विषय वाहिन्यांना वेगळा प्रेक्षकही मिळवून देतात. सरतेशेवटी सध्या आरोग्य महत्त्वाचे असल्याने सरकारी नियम आणि र्निबध यांचा अवलंब करून वाहिन्या आपली वाटचाल करतील. फक्त गेलेल्या काळाने आपल्याला खूप काही शिकवलं, त्यातली महत्त्वाची शिकवण म्हणजे, ‘घडणाऱ्या बदलाला स्वीकारणे, त्याला सामोरे जाणे आणि त्यासोबत आपणही बदलत जाणे हेच तरण्याचे सूत्र आहे.’ – सतीश राजवाडे, अभिनेता, दिग्दर्शक

चित्रपट – ‘सकस आशयनिर्मिती वाढेल’

करोनाचे गंभीर परिणाम इतर क्षेत्रांप्रमाणेच मनोरंजन आणि पर्यायाने चित्रपट क्षेत्रावरही झाले. पण शिथिलीकरणानंतर हळूहळू बऱ्याच गोष्टी पूर्वपदावर येतानाही आपण पाहतो आहोत. करमणूक प्रधान उद्योग उदाहरणार्थ हॉटेल, ट्रॅव्हल आणि टुरिझम हेसुद्धा आता पूर्वीसारखे रुळावर येत आहेत. एवढेच नाही तर नाटकांनासुद्धा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आपण पहिला. चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर टीव्ही उद्योगाचे अर्थचक्रसुद्धा पूर्वपदावर येते आहे. त्यातही खास चित्रपटांचा अंदाज घेतला तर अनेक चित्रपट सध्या चित्रीकरण होऊन पोस्ट प्रॉडक्शनच्या प्रतीक्षेत आहेत. नुकताच भारतात करोना लशीचा ड्राय रन सुरू झाला असल्याने करोनापेक्षा सकारात्मकतेची लाट जाणवते आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनातील भीती कमी होऊन त्याजागी चित्रपटाबद्दल उत्साही भावना निश्चित तयार होईल. मधल्या काळात प्रेक्षकांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आशय इतर माध्यमांमध्ये पाहिले असल्याने, प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे दर्जेदार आशयाची अपेक्षा येणाऱ्या चित्रपटाकडून असतील. मराठी सिनेमा हा आशयप्रधानच असतो, येत्या काळात तो अधिक सकस होत जाईल आणि याचा चांगला अनुभव संपूर्ण चित्रपट क्षेत्राला मिळेल. विषयासोबतच मांडणीतले वेगळेपण महत्त्वाचे ठरेल, आणि जे चित्रपट या कसोटीवर खरे उतरतील ते नक्कीच यशस्वी होतील. चित्रपट निर्मिती हा खरंतर एकूण प्रवासातील अर्धा भाग. पूर्वप्रसिद्धी आणि वितरण हा तितकाच महत्त्वाचा आणि पुढचा टप्पा होय. मराठी चित्रपटांसाठी तर तो अधिकच महत्त्वपूर्ण वाटतो. कारण अनेक उत्तम मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचू शकत नाहीत. करोनापश्चात पूर्वप्रसिद्धी आणि सक्षम वितरण पूर्वीपेक्षाही जास्त प्रभावी करण्याचा विचार आहे. ते करणे अपरिहार्य असेल, कारण हिंदी- मराठी अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी थांबलेले आहेत. त्यामुळे आपल्याच चित्रपटाला प्रेक्षक खेचून आणण्याची स्पर्धा अजूनच तीव्र झालेली दिसेल. परिणामी, पूर्वप्रसिद्धीचे तंत्र आणि त्या अनुषंगाने आर्थिक गणितही बदलेल. माध्यमांचा विचार केला तर टीव्हीचे महत्त्व वाढते आहे. मराठीत निर्माण होणाऱ्या एकूण चित्रपटांची संख्या व बजेट पूर्वीपेक्षा काहीसे कमी होऊ शकते, पण त्याच वेळी या क्षेत्राकडे एक उद्योग म्हणून पाहणाऱ्या निर्मात्यांसाठी ही संधी ठरणार आहे. आजच एका तमिळ चित्रपटाला शंभर टक्के उपस्थितीत प्रक्षेपणाची परवानगी मिळाली. त्यामुळे आपल्याकडेही अद्ययावत सुरक्षिततेच्या सोयी वापरून पूर्ण आसन क्षमतेत चित्रपटगृह सुरू होईल अशी आशा आहे.  – मंगेश कुलकर्णी, व्यवसाय प्रमुख, झी स्टुडिओज