‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची कृतज्ञ भावना

रंगभूमीवर नाटकांतून भूमिका साकारणं असो किंवा चित्रपटांतून अभिनय करणं, जीवनामध्ये जे पाहिजे ते करायला मिळालं; आणखी काय हवं, अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांनी बुधवारी व्यक्त केली. मराठी रंगभूमीवरचा मी एकमेव नटश्रेष्ठ आहे, असा माझा दावा नाही आणि तशी वस्तुस्थितीदेखील नाही. माझ्याकडे असलेले ज्ञान आणि क्षमता यांचा पुरेपूर वापर करून मी काम केले. आता बाकी मूल्यमापन रसिकांनी करावे, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली.

‘नटसम्राट, ‘हिमालयाची सावली’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘मित्र’, ‘गिधाडे, ‘किरवंत’ अशा नाटकांसह ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’ आणि ‘मुक्ता’ ते अगदी चार वर्षांपूर्वी ‘नागरिक’ या चित्रपटातील भूमिकांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे डॉ. श्रीराम लागू गुरुवारी (१६ नोव्हेंबर) वयाची नव्वद वर्षे पूर्ण करीत आहेत. सध्या वेळ मिळेल तेव्हा वाचन करतो आणि काही गोष्टींबाबत डोक्यामध्ये विचार सुरू असतात ते जमेल तसे कागदावर उतरवून काढतो. अर्थात जे काही लिहितो तो माझ्या वैचारिक आनंदाचा भाग आहे. त्यामुळे त्याचे पुस्तक होईल की नाही हा विचारही केलेला नाही. किंबहुना ते उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवूनही लेखन करीत नाही. जे काही लिहितो ते स्वान्तसुखाय स्वरूपाचेच आहे, असे डॉ. लागू यांनी स्पष्ट केले.

माझी वाङ्मयाची आवड दांडगी आहे, त्यामुळे पूर्वी मी अधाशासारखा वाचन करीत असे. सुदैवाने वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, प्रेमानंद गज्वी, सारंग साठे अशा नाटककारांची नाटके माझ्याकडे आली. त्यामुळे या साऱ्या लेखकमंडळींशी संबंध आला. अन्यथा कुसुमाग्रज यांच्याशी माझी मैत्री आहे असे म्हणण्याची माझी पात्रता नाही हे मला पक्के ठाऊक आहे. एखादा माणूस, लेखक, अभिनेता, अभिनेत्री हे आपल्याला त्यांच्या कर्तृत्वामुळे आवडतात, असेही लागू यांनी स्पष्ट केले. डॉ. लागू म्हणाले, नट म्हणून मी या जगात कुठे उभा राहू शकतो? उभा राहू शकतो असे चुकून तरी माझ्या हातून काही झालं आहे का?, झालं असेल तर का झालं आणि नसेल झालं तर का नाही झालं, अशा विषयांवर सध्या मी चिंतन करीत आहे. ‘लमाण’ हा माझ्या आठवणींचा खजिना आहे. त्यावरून तरी मी स्वत:ला लेखक समजत नाही. माणसाला निश्चितपणे काही म्हणायचे असेल आणि ज्याच्या बोलण्याला-लेखनाला किंमत असेल तर त्याने जरूर व्यक्त व्हावे. त्याला मी लेखक मानतो.

‘झाकोळ’ची रिळं जतनासाठी  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये

‘झाकोळ’ या डॉ. श्रीराम लागू यांनी दिग्दर्शित केलेल्या एकमेव चित्रपटाची रिळं आता लवकरच जतन करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केली जाणार आहेत, अशी माहिती ‘रूपवेध चित्र’च्या प्रमुख आणि या चित्रपटाच्या निर्मात्या दीपा श्रीराम यांनी दिली. हिंदूी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री तनुजा आणि तेव्हा बालकलाकार असलेली ऊर्मिला मातोंडकर यांच्या मराठीतील पदार्पणासह डॉ. श्रीराम लागू, सरला येवलेकर, शांता जोग, दत्ता भट आणि ‘लिटल मास्टर’ सुनील गावसकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची पटकथा-संवादलेखन अशी जबाबदारी लागू यांनी सांभाळली होती. पु. शि. रेगे आणि कवी अनिल यांच्या गीतांना भास्कर चंदावरकर यांचे संगीत होते. ‘आज अचानक गाठ पडे’ हे गीत पं. कुमार गंधर्व यांच्यावर, तर ‘बोले पिया कब तो आओगे’ ही ठुमरी शोभा गुर्टू यांच्यावरच चित्रित झाली होती. ‘झेलीले न मी फुला’ हे गीत माधुरी पुरंदरे यांनी गायले आहे. डॉ. लागू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या चित्रपटाची रिळं लवकरच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केली जाणार आहेत.