श्रृंगारिक आणि रोमांचक चित्रपट बनविण्यात त्याची मक्तेदारी आहे. ‘गुलाम’, ‘राज’, ‘हेटस्टोरी’,  ‘क्रिचर ३डी’, ‘खामोशिया’ यांसारखे अनेक चित्रपट त्याने बॉलीवूडला दिले आहेत. नुकतेच या दिग्दर्शकाने अश्लिल चित्रपटात काय गैर आहे? असा सवाल करून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधलेय. हा प्रश्न केलाय दिग्दर्शक विक्रम भट याने.
विक्रमचा आगामी ‘लव्ह गेम्स’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्यानिमित्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने त्याच्याशी संवाद साधला. सेन्सॉर बोर्डाकडून ब-याचदा श्रृंगारिक किंवा अश्लिल दृश्य असलेल्या चित्रपटांना कात्री लावली जाते. यावर विक्रमने नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, अश्लिल चित्रपट बघायचे की नाही हे दुस-याने का ठरवावे? गेल्या काही वर्षात सेन्सॉर बोर्डात काहीच बदल झालेले नाहीत. उलट आता तर अधिक वाईट अवस्था आहे. काँग्रेसचे सरकार खूप चांगले होते. कमी दर्जाचे, अश्लिल चित्रपट पाहिले तर काय चुकलं? मला अश्लिल चित्रपट बघायचे आहेत तर ते बघण्याचा मला अधिकार नाही का?  मी काय बघायचे हे तुम्ही का ठरवणार? असे अनेक प्रश्न विक्रमने यावेळी केले. पुढे तो म्हणाला की, मी एक अश्लिल माणूस असून मला अश्लिल चित्रपट पाहायचे आहेत. त्यासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. तुम्ही असं म्हणू शकता की, हा चित्रपट अश्लिल आहे. त्यावर माझी हरकत नाही. पण माझ्यासाठी काय चांगले किंवा वाईट आहे, ते तुम्ही मला सांगू नका. ‘लव्ह गेम्स’मध्ये ‘फक’ असा शब्द होता. त्यावर सेन्सॉर बोर्डाने तुम्ही ‘फकिंग’ शब्द वापरू शकता पण ‘फक’ शब्द चालणार नाही असे सांगितले. चित्रपटात ‘फकिंग’ शब्द चालतो पण ‘फक’ चालत नाही आता यात काय अर्थ आहे, असा सवाल विक्रमने केला.
पत्रलेखा, गौरव अरोरा, तारा अलिशा यांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि विक्रम भट दिग्दर्शित ‘लव्ह गेम्स’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.