दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी मेकअपने आपलं वय कधीच लपवलं नाही. अस्सलतेच्या आविष्कारातच कला आणि कलावंत यांची महत्ता असते, हे त्यांनी वेळोवेळी पटवून दिलंय. एरव्ही कुठल्याही कार्यक्रमात ते अत्यंत साध्या वेशातच दिसतात. मात्र त्यांच्या याच साध्या वेशाची एका चाहत्याने खिल्ली उडवली होती. विशेष म्हणजे, रजनीकांत यांनी स्वत: हा किस्सा सांगून उपस्थितांना हसवलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रजनीकांत यांचा ‘रोबोट’ हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. तामिळमध्ये त्याला ‘एथिरन’ असं नाव दिलं होतं. या तामिळ चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा कार्यक्रम मलेशियामध्ये पार पडला होता. त्यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या रजनीकांत यांनी हा किस्सा सांगितला. तिथे चित्रपटातील नायिका ऐश्वर्या राय बच्चनसुद्धा हजर होती. रजनीकांत म्हणाले, “ऐश्वर्याजी, माझ्यासोबत काम करण्यास होकार दिल्याबद्दल धन्यवाद! मी बेंगळुरूला माझ्या भावाच्या घरी गेलो होतो. भावाच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला जेव्हा कळलं की मी आलोय, तेव्हा तो मला भेटायला घरी आला. नंदुलाल असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचं वय साठ वर्षांहून अधिक आहे.”

पुढे रजनीकांत आणि नंदुलाल यांच्यामधील झालेला संवाद त्यांनी सांगितला :

नंदुलाल : काय रजनी? केसांना काय झालं? (हे ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.)
रजनीकांत : केस गळाले. तो विषय जाऊ द्या.
नंदुलाल : अच्छा, मग तू सध्या कोणत्या चित्रपटात काम करतोय?
रजनीकांत : सध्या एका चित्रपटाची शूटिंग सुरू आहे.
नंदुलाल : कोणता चित्रपट आहे?
रजनीकांत : रोबोट, ऐश्वर्या रायचीही त्यात भूमिका आहे.
नंदुलाल : ऐश्वर्या राय? खूप सुंदर अभिनेत्री आहे ती. पण हिरो कोण आहे?
रजनीकांत : मी हिरो आहे.

हे ऐकल्यावर नंदुलाल काही वेळेसाठी स्तब्धच उभे होते. पुढे रजनीकांत म्हणाले, “ते तिथून निघाले, पण जाताना त्यांच्यातील संवाद मला ऐकू आला. काय झालंय ऐश्वर्याला? अभिषेकला काय झालंय? अमिताभ यांना काय झालंय? यांच्यासोबत हिरोइन म्हणून का काम करतेय?” हा संपूर्ण किस्सा ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असलेले जोरजोरात हसू लागले.

चित्रपटातील लूक वगळता रजनीकांत यांनी सामान्य जीवनात कधीच त्यांच्या लूकला फार महत्त्व दिलं नाही. सार्वजनिक ठिकाणी ते साधेपणानेच वागतात. त्यांचा हाच साधेपणा त्यांना ‘सुपरस्टार’ बनवून जातो, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When a fan made fun of rajinikanth bald head and age ssv
First published on: 09-04-2020 at 13:12 IST