चाहते आपल्या लाडक्या कलाकारासाठी काय करतील, याचा काही नेम नाही. अभिनेता संजय दत्तच्या एका चाहतीने त्याच्यावर आपली जमापुंजीच उधळून टाकली. ६२ वर्षीय निशी त्रिपाठी यांनी मृत्यूपूर्वी बँकेत जमा केलेली रक्कम संजूबाबाच्या नावे केली.

२९ जानेवारी रोजी पोलिसांनी संजयला फोन केला. ‘दोन आठवड्यांपूर्वी निशी यांचं निधन झालं आणि मृत्यूपूर्वी त्यांनी त्यांच्या बँक खात्यातील रक्कम आणि बँक लॉकरमधील ऐवज तुमच्या नावे केला आहे,’ असं पोलिसांनी त्याला सांगितलं. तेव्हा संजयलाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्याने एकही पैसा घेण्यास नम्रपणे नकार दिला. ती सर्व रक्कम आणि ऐवज त्रिपाठी कुटुंबाला हस्तांतरीत करण्याची विनंती संजूबाबाने ‘बँक ऑफ बडोदा’च्या मुंबईतील वाळकेश्वर शाखेला पत्र लिहून केली.

निशी या संजय दत्तच्या इतक्या मोठ्या चाहत्या आहेत, हे त्रिपाठी कुटुंबालाही त्यांच्या मृत्यूनंतरच समजलं. दरम्यान कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्याने निशी त्रिपाठींचं लॉकर अद्याप उघडण्यात आलेलं नाही. मात्र त्यांचा पैसा किंवा संपत्ती याच्याशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, ती संपत्ती त्रिपाठी कुटुंबालाच मिळायला हवी, असं संजय दत्तने आपले वकील सुभाष जाधव यांच्या माध्यमातून कळवलं आहे.

निशी त्रिपाठी यांचं १५ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या गृहिणी होत्या. मलबार हिल येथे त्या राहत होत्या. निशी यांनी मृत्यूच्या काही महिने आधी बँकेकडे नामांकन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये ‘फिल्मस्टार संजय दत्त’ असा उल्लेख असून त्याचा पाली हिलमधील पत्ता लिहिला आहे.