‘डेली बेली’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज १० वर्षे पूर्ण झाले आहेत. अभिनेता इमरान खान, वीर दास आणि कुणाल रॉय कपूर स्टारर या चित्रपटाची बरीच चर्चा देखील झाली होती. याच चित्रपटातील गाणं ‘भाग डीके बोस’ एकीकडे तरूणाईमध्ये सुपरहिट ठरलं तर दुसरीकडे या गाण्यात अपशब्द -डीके अत्यंत बेमालूमपणे वापरण्याचा आरोप देखील करण्यात आला होता. संगीतकार शंकर महादेवनने तर या गाण्याबद्दल आक्षेप नोंदवत म्हटलं होतं की, अशा प्रकारचं गाणं मी कधीही संगीतबद्ध केलं नसतं. आशा वातावरणात ‘भाग बोस’ कसं तयार केलं आणि यामागची कहाणी काय आहे जाणून घेऊयात….

‘डेली बेली’चे चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनय देव यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत या चित्रपटाने अनेक किस्से शेअर केले आहेत. दिग्दर्शक अभिनय देव यांनी चित्रपटाच्या गाण्यासाठी सुरवातीला संगीत दिग्दर्शक राम संपत यांच्याकडील जवळपास तीन गाणी रिजेक्ट केली होती. दिग्दर्शक अभिनय देव हे त्यांच्याकडून चित्रपटाच्या फ्लेवरशी मिळती जुळती एक हूक लाईन अपेक्षित करत होते. दिवस-रात्र एक करत दिग्दर्शक अभिनय देव हे टीमसोबत चित्रपटाच्या गाण्यासाठी काम करत होते, मात्र जी अपेक्षित होती ती हूक लाइन त्यांना मिळत नव्हती. त्यामूळे सगळेच जण चिंतेत होते. गाण्यासाठी काम करता करता टीम मेंबर्समध्ये शाळा-कॉलेजच्या काळातील गप्पा सुरू होत्या. त्यावेळी त्यांच्या टीममधील लेखकांनी दिल्लीतल्या कॉलेजमध्ये असताना शिव्या देण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धती तयार करत असल्याचा एक किस्सा सांगितला. शिव्या न देता ते त्यावेळी ‘डीके बोस’ असं म्हणत आम्ही आमचा राग व्यक्त करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. या गप्पा ऐकताना संगीत दिग्दर्शक राम संपत यांना गाण्यासाठी आणखी एक नवी कल्पना सुचली आणि बघता बघता केवळ १० मिनीटांत चित्रपटासाठी जसं हवंय तसं गाणं आणि त्याची चाल सुद्धा तयार झाली. या गाण्याला सुरवातीला ऐकल्यानंतर सगळ्यांनाच ते गाणं आवडलं. या आनंदात दिग्दर्शक अभिनव देव यांनी त्या रात्रीच अभिनेता आमिर खानला फोन लावला.

गाणं ऐकण्यासाठी त्याच रात्री स्टुडिओमध्ये पोहोचला आमिर

ज्या क्षणी अपेक्षित होतं तसं गाणं चित्रपटाच्या टीमला मिळालं, त्या आनंदाच्या भरात दिग्दर्शक अभिनय देव यांनी रात्री १२ च्या सुमारास आमिर खानला फोन केला. गाणं ऐकवण्यासाठी त्यांनी आमिरला त्याच क्षणी स्टुडिओमध्ये येण्यासाठी सांगितलं. त्यावेळी आमिर थोडा गोंधळात पडला. रात्र झाली असल्यामुळे आमिरने फोनवरच गाणं ऐकवता येईल का, असं विचारलं. त्यावेळी दिग्दर्शक अभिनय देव यांनी गाणं तर स्टुडिओमध्येच ऐकणं मजेदार असल्याचं आमिरला सांगितलं. हे ऐकून आमिर देखील उत्सुक झाला आणि त्याच रात्री तो स्टुडिओमध्ये गाणं ऐकण्यासाठी आला. त्यावेळी चित्रपटाच्या टीमने आमिरला घाबरत घाबरत हे गाणं ऐकवलं. या गाण्यावर आमिर काय प्रतिक्रिया देईल, याची कुणाला काहीच कल्पना नव्हती.

चित्रपटाच्या टीमनी तयार केलेलं गाणं ऐकून आमिर जवळजवळ पाच मिनीट हसत राहिला. “तू माझं करिअर बर्बाद करणार आहेस”, असं हसत हसत आमिर म्हणाला होता. पण दिग्दर्शक अभिनय देव यांना हे गाणं रिजेक्ट करताच आलं नाही. यासाठी आमिर खानला बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांनी तयार केलं आलं होतं. पण आमिर खान जे काही ठरवतो, मग पुढे त्यात तो जीव ओतून मेहनत घेतो आणि ते यशस्वी करूनच दाखवतो.