24 April 2019

News Flash

बिग बींसमोर सिगारेट ओढली तर चालेल का? आमिरने मागितला शाहरुखचा सल्ला

बिग बींसोबत काम करण्याचं दडपण होतं असं आमिरने सांगितलं.

आमिर खान आणि शाहरुख खान

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात पहिल्यांदाच आमिर खान आणि अमिताभ बच्चन स्क्रिन शेअर करत आहेत. बिग बींसोबत काम करण्याचं स्वप्न प्रत्येक कलाकाराचं असतं आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना त्याचं दडपणसुद्धा येतं. याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर सुद्धा अपवाद ठरला नाही. सेटवरच्या काही गमतीजमती व मजेशीर किस्से आमिरने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

बिग बींसोबत काम करण्याचं दडपण असल्याने सुरुवातीच्या काळात मी थोडा बुजलो होतो पण त्यांच्या शांत व संयमी स्वभावामुळे माझं अवघडलेपण दूर झालं असं आमिरने सांगितलं. आमिर बॉलिवूडमधील त्याच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच बिग बींसोबत काम करत आहे. सेटवर ते समोर असताना धुम्रपान कसं करावं असा प्रश्न आमिरला पडला होता. बिग बींना आपलं व्यसन रुचणार नाही अशी भीती आमिरला होती. पण यावर तोडगा काढण्यासाठी त्याने किंग खान अर्थात शाहरुखची मदत घेतली.

आमिरने पुढे सांगितलं की, ‘मी आणि शाहरुख एकाच स्टुडिओत काम करत होतो. असंच एकदा बोलता बोलता मी त्याला विचारलं की तू अमितजींसमोर सिगारेट ओढतोस का? मी त्यांच्यासमोर सिगारेट ओढली तर त्यांना चालेल का?’ शाहरुख आणि बिग बींनी एकत्र बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे बिग बींच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी शाहरुखला माहीत असतील या अंदाजाने आमिरने त्याचा सल्ला विचारला. ‘तू त्यांच्यासमोर सिगारेट ओढू शकतोस. मीसुद्धा त्यांच्यासमोर सिगारेट ओढायचो,’ असं उत्तर शाहरुखने दिलं. तेव्हा तू त्यांची परवानगी घ्यायचास का असा प्रश्न आमिरने विचारला. त्यावर बिग बींनी मला कधीच थांबवलं नाही असं शाहरुखला म्हटलं. पण जर मी त्यांच्यासमोर धुम्रपान केलं आणि त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला तर मी काय करावं, त्यांना काय उत्तर द्यावं हे मला कळतच नाही, असं आमिरने सांगितलं.

शाहरुख आणि आमिरमधला हा संवाद नंतर बिग बींना एका फोटोग्राफरकडून कळला. आमिरशी एकदा गप्पा मारताना बिग बींनी त्याला या संवादाबाबत विचारलं. तेव्हा आमिरने होकारार्थी मान डोलावत त्यांना थेट विचारलं की मी तुमच्यासमोर सिगारेट ओढली तर चालेल ना तुम्हाला? आमिरच्या या प्रश्नावर बिग बी म्हणाले की, ‘हो चालेल, पण ते तुमच्या स्वास्थ्यासाठी योग्य नाही.’

आमिर आणि अमिताभ बच्चन यांचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ गुरुवारी प्रदर्शित झाला. यामध्ये आमिर, बिग बींसोबतच फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

First Published on November 8, 2018 7:21 pm

Web Title: when aamir khan sought shah rukh khan advice on how to smoke in front of amitabh bachchan