बॉलिवूडच्या सर्वांत सुंदर अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सुष्मिता सेन या दोघींचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘मिस वर्ल्ड’ आणि ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणाऱ्या या दोघींमध्ये १९९४ मध्ये एका सौंदर्यस्पर्धेत चुरस रंगली होती. अगदी अंतिम फेरीपर्यंत दोघी पोहोचल्या होत्या आणि अटीतटीच्या स्पर्धेत सुष्मिताने बाजी मारली. अवघ्या शून्य पूर्णांक दोन गुणांच्या फरकाने सुष्मिताने ऐश्वर्याला हरवलं होतं.
१९९४ मध्ये गोव्यात पार पडलेल्या ‘मिस इंडिया’ सौंदर्यस्पर्धेत ऐश्वर्या आणि सुष्मिताने भाग घेतला होता. तेव्हा ऐश्वर्याच ही स्पर्धा जिंकेल अशी अनेकांना आशा होती मात्र अंतिम फेरीत सुष्मिताने बाजी मारली. अंतिम फेरीत दोघी पोहोचल्या होत्या.

अंतिम फेरीत ऐश्वर्याला प्रश्न विचारण्यात आला की, ‘तुझ्या होणाऱ्या नवऱ्यात तू कोणते गुण पाहशील? द बोल्ड अँड ब्युटीफूलमधल्या रिज फॉरेस्टरसारखा नवरा हवा की संता बारबरामधल्या मसॉन कॅप्वेलसारखा हवा?’ रिज आणि मसॉन हे दोन्ही वेगवेगळ्या टीव्ही शोमधील काल्पनिक पात्र आहेत. या प्रश्नावर ऐश्वर्याने उत्तर दिलं की, ‘मसॉन, खरंतर रिज आणि मसॉनमध्ये बरंच साम्य आहे. पण मी मसॉनला निवडेन कारण तो खूप काळजी घेणारा आहे आणि त्याची विनोदबुद्धी खूपच चांगली आहे. माझ्या स्वभावाशी हे खूप मिळतंजुळतं आहे.’

वाचा : १५ वर्षीय मुलाने केला होता सुष्मिता सेनचा विनयभंग

दुसऱ्या बाजूस ‘देशातल्या वस्त्राच्या इतिहासाबद्दल तुला काय माहित आहे?’ असा प्रश्न सुष्मिताला विचारण्यात आला होता. त्यावर तिने विचारपूर्वक उत्तर दिलं की, ‘महात्मा गांधींच्या खादीपासूनचा इतिहास आहे. तिथपासून वस्त्रोद्योगात बरीच क्रांती झाली आहे. पण त्याचं मूळ खादी हेच असेल.’ सुष्मिताच्या याच उत्तरामुळे ती ऐश्वर्यापेक्षा सरस ठरली.