बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार असा नावलौकिक असलेले अभिनेते म्हणजे अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर. या दोन दिग्गज कलाकारांनी १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘कोहराम’ या चित्रपटात एकत्र भूमिका केली होती. मात्र, त्यानंतर हे दोन्ही कलाकार एकत्र चित्रपटात दिसले नाही. सदर चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी त्यांच्यामध्ये काही वाद असल्याचीही चर्चा होती. पण, ही केवळ अफवा होती असे म्हणत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मैत्रीचे काही किस्से सांगितले. ते म्हणाले की, अमिताभ हे माझे खूप चांगले मित्र आहेत. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत पण जेव्हा कधी आम्ही भेटतो अमिताभजी म्हणतात, ‘नानाजी कैसे है आप?’. मलाचं नाही पण त्यांच्यापेक्षा लहान असणा-यांनाही ते ‘आप’ म्हणून संबोधतात. एकदा त्यांनी चित्रीकरणावेळी शर्ट घातलेला होता. मला ते शर्ट आवडलं आणि मी त्याची प्रशंसा केली. त्यानंतर चित्रीकरण पूर्ण करून मी  व्हॅनिटीमध्ये गेलो त्यावेळी हँगरला माझ्या शर्टाऐवजी त्यांनी घातलेला शर्ट लटकत होता. स्वतःचा शर्ट मला देऊन ते माझा शर्ट घालून गेले होते. आठवण म्हणून मी तो शर्ट अजूनही माझ्याकडे जपून ठेवला आहे.
अजून एक आठवण सांगताना नाना म्हणाले की, एकदा अमिताभ यांनी माझ्या हातात मिठाईचा अख्खा बॉक्स आणून दिला. मी जेव्हा त्यामागचे कारण विचारले तर ते म्हणाले, माझ्या मुलीला बाळ झालं त्याचीच ही मिठाई, मी ‘नाना’ झालो. त्यावर मी मिश्कीलपणे म्हणालो, तुम्ही ‘नाना’ होण्यासाठी बरीच वर्ष घेतलात. मी बघा, माझ्या जन्मापासूनचं ‘नाना’ आहे.
नाना पाटेकर यांचा ‘वेलकम बॅक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.