बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ व अभिनेता रणबीर कपूर यांचे प्रेमसंबंध आणि त्यानंतर झालेला ब्रेकअप हे तर सर्वांनाच माहित आहे. जवळपास सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर हे दोघे विभक्त झाल्याच्या बातम्या गेल्याच वर्षी आल्या होत्या. त्यामुळे या दोघांचे लग्न होऊन कतरिनाला मिसेस कतरिना कैफ कपूर म्हणून पाहण्याची त्यांच्या चाहत्यांची इच्छा अधुरीच राहिली. पण एका ब्रिटीश रॉक बँडचा मुख्य गायक असलेला क्रिस मार्टीन याने कतरिनाच्या नावाचा उल्लेख चक्क कतरिना कैफ कपूर असा केला.
प्रसिद्ध गायक क्रिस मार्टीन याने ‘ग्लोबल सिटीझन फेस्टीवल’मध्ये भाषणादरम्यान कतरिनाच्या नावाचा उच्चार ‘कतरिना कैफ कपूर’ असा केल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं. मात्र, आपली चुकी लक्षात येताच त्याने त्याची चूक सुधारली. न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमादरम्यान चाहत्यांशी बोलताना ख्रिस मार्टिनने ‘२०१६ ग्लोबल इंडियन फेस्टिव्हल’ची माहिती दिली. यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि खासदार पूनम महाजन यादेखील उपस्थित होत्या. क्रिस मार्टिनचा ब्रिटिश बँड ‘कोल्डप्ले’ १९ नोव्हेंबरला मुंबईत आपला पहिला कार्यक्रम सादर करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘ग्लोबल सिटिझन’ या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘कोल्डप्ले’ बँड मुंबईत येणार आहे. या कार्यक्रमाला काही बॉलीवूड सेलिब्रेटींचाही हातभार लागणार आहे. त्यांचीच नावे घेत असताना कतरिना व करिना यांची नावे एकामागोमाग असल्याने क्रिसने कतरिनाच्या नावाचा उच्चार ‘कतरिना कैफ कपूर’ असा केला.
क्रिस मार्टिन हा ‘कोल्डप्ले’चा कर्ताधर्ता. स्वत: पियानो वादक असलेला क्रिस गेली काही वर्षे ‘ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हल’ ही संकल्पना राबवतो आहे. दरम्यान, ‘कोल्डप्ले’च्या कार्यक्रमाचे एक तिकीट कमीत कमी २५ हजारांपासून उपलब्ध होणार असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, ही केवळ अफवा असून सदर कार्यक्रमाचे एक तिकीट पाच हजारांना विकण्यात आले. पहिल्या टप्प्यात विकण्यात आलेल्या तिकीटांची अवघ्या काही तासांतच विक्री झाली. त्यानंतर तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आली. ही तिकीटे आता साडे सात हजारांना विकली जात आहेत.
संगीतकार ए. आर. रेहमान, शंकर-एहसान-लॉय, गायक अरिजीत सिंग यांच्याबरोबर आमिर खान, अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, कतरिना कैफ, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करिना कपूर-खान, दिया मिर्झा अशी भलीमोठी स्टारमंडळीही या महोत्सवात आणि मोहिमेत सक्रिय सहभागी होणार आहेत. दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता आणि पिण्यासाठी स्वच्छ पाणी-स्वच्छता या तीन मुद्दय़ांवर ‘ग्लोबल सिटिझन इंडिया’ काम करणार असून त्या त्या क्षेत्रात कार्यशील असलेले बॉलीवूड कलाकार या मोहिमेशी जोडले गेले आहेत.