उडता पंजाब चित्रपटाच्या वादाच्या निमित्ताने सिनेमा व सेन्सॉर यांच्या नात्यांमध्ये कोण बरोबर व कोण चूक याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. अशा वेळी देव आनंदने निर्मित व दिग्दर्शित केलेल्या सेन्सॉर या नावाच्या चित्रपटाची आठवण येते. आपल्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात या नावाचा चित्रपट आला आहे हे विशेष.  पण का बरे आला हे जास्त महत्वाचे आहे. देव आनंद निर्मित व दिग्दर्शित प्रेम पुजारीपासूनच्या प्रवासात काही दृष्यांबाबत सेन्सॉरशी होणारा वाद सच्चे का बोलबाला सौ करोड प्यार का तराना गँगस्टर या चित्रपटाच्या वेळी शिगेला पोहचला. देवचे म्हणणे होते की सेन्सॉरने परंपराना चिकटून न बसता बदतल्या.काळाचा विचार व स्वीकार करावा. आपले हेच मत मांडण्याचा प्रयत्न म्हणून देवने २००१ साली सेन्सॉर या नावाचा चित्रपट पडद्यावर आणला. त्यात तोच नायक होता हे वेगळे सांगायची गरज नाही. त्याच्यासोबत हेमा मालिनी, रेखा, जॅकी श्रॉफ, ममता कुलकर्णी, पूजा बत्रा इत्यादींच्या भूमिका होत्या. हे सगळे असले तरी हा चित्रपट अगदी सामान्य होता. त्यामुळे तो कधी आला गेला हे फारसे कोणालाच समजले नाही. देव आनंदने नेहमीप्रमाणे त्याचा आम्हा चित्रपट समीक्षकांसाठी विशेष खेळ आयोजित केला. पण तो अवघा एक दीड स्टार देणारा चित्रपट ठरला. उडता पंजाब चित्रपटाच्या निमित्ताने सेन्सॉर चर्चेत असताना या नावाचा चित्रपट २००१ साली येऊन गेला आहे हे सांगायला हवेच.